आतापर्यंत निम्म्याही शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:18 AM2019-06-04T03:18:13+5:302019-06-04T03:18:19+5:30
३१ मेची डेडलाइन हुकली; शिक्षक बदल्या करताना शिक्षण विभागाची दमछाक
अविनाश साबापुरे
यवतमाळ : शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ३१ मेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र शिक्षकांचे शंभर टक्के मॅपिंग जून उजाडल्यावरही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बदल्यांचे प्रत्यक्ष आदेश शिक्षकांच्या हाती पडण्यासाठी आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत १ लाख ८७ हजार ७२३ शिक्षकांपैकी फक्त ६५ हजार ८१० शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.
शिक्षकांचे मॅपिंग झाल्यावरच राज्यातील किंवा एखाद्या जिल्हा परिषदेतील बदलीपात्र शिक्षक आकडा निश्चित होणार आहे. मॅपिंग करताना जिल्हा परिषदेची यंत्रणा शिक्षकाचा प्रथम नियुक्ती दिनांक, सध्याच्या शाळेत तो किती वर्षांपासून कार्यरत आहे, त्याच्यावर कधी निलंबनाची कारवाई तर झालेली नाही ना, त्याचे सध्याचे वय किती आहे, अशा प्रकारची माहिती संकलित करीत आहे. एकदा ही यादी झाली, तरच संवर्ग १, २ मधील कर्मचाऱ्यांचीही माहिती स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या एकाही जिल्हा परिषदेने शंभर टक्के शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण केलेले नाही.
२६,८४७ शिक्षकांचे काय?
आॅनलाइन बदली प्रक्रियेत प्रत्येक शिक्षकाचे मॅपिंग होणे गरजेचे आहे. असे असतानाही राज्यातील २ लाख १४ हजार ५७० शिक्षकांपैकी केवळ १ लाख ८७ हजार ७२३ शिक्षकांचे मॅपिंग केले जात आहे. त्यामुळे उर्वरित २६ हजार ८४७ शिक्षकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, निलंबित असलेले शिक्षक, विनाअर्ज सुटीवर असलेले शिक्षक, ५३ वर्षापेक्षा अधिक वय असलेले शिक्षक मॅपिंगमधून वगळले गेले आहेत. मात्र, मॅपिंगपूर्वीच अशा शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाला मिळाली असेल, तर मोठ्या प्रमाणात मॅपिंग कशाला केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सातारा जिल्हा परिषद आघाडीवर
सातारा जिल्हा परिषदेने ७ हजार ६३६ पैकी ७ हजार ६०४ शिक्षकांचे मॅपिंग करून ९५ टक्के काम पूर्ण केले आहे. त्याखालोखाल भंडारा ८९, नंदुरबार ८५, वर्धा ५९, कोल्हापूर ५१, यवतमाळ ३७, परभणी ३३, नांदेड ३३, उस्मानाबाद ३३, गडचिरोली ३०, सांगली २३, तर अहमदनगर जिल्हा परिषदेने २२ टक्के शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण केले आहे.
राज्यातील उर्वरित जिल्हा परिषदांनी २० टक्केही काम पूर्ण केलेले नाही. विशेष म्हणजे, अकोला, धुळे, हिंगोली, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, जालना, लातूर, बिड जिल्हा परिषदेत १ जूनपर्यंत मॅपिंगचे काम शून्य टक्के झालेले आहे.