अबतक छप्पन; हातांनी बोअर मारणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 07:24 PM2019-05-14T19:24:41+5:302019-05-14T19:26:01+5:30
शंभर फूटहून अधिक खोलवर खोदले आड; सांगोला तालुक्यातील बलवडीच्या सुपुत्राचा दावा
सांगोला : आपण गावोगावी मशीनने बोअर पाडताना नेहमीच पाहतो, मात्र हातांनी बोअर पाडलेले तुम्ही पाहिले आहे का ? असाच एक अवलिया आहे, ज्याने आतापर्यंत एक-दोन नाही तर तब्बल अबतक छपन्नपेक्षा जास्त बोअर हातांनी बनवल्या आहेत आणि तेही अगदी एका मापात. हा अवलिया आहे बलवडी (ता. सांगोला) गावाचा.
सांगोल्याची ओळखच कायम दुष्काळी तालुका आणि या तालुक्यातील बलवडी गावदेखील पिढ्यान्पिढ्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले़ अशा या बलवडी गावात पिण्याच्या पाण्याची कायम भीषण टंचाई असताना बोअर पाडणेदेखील शेतकºयांच्या आवाक्याबाहेरचे. याचीच जाण असलेल्या दत्ता शिंदे यांनी हातांनी बोअर पाडायच्या प्रयोगाला २०११ मध्ये सुरुवात केली.
पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्यासाठी लहान लहान आड केले जायचे आणि हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून दत्ताने छोटे दांड्याचे फावडे आणि छोटी कुदळ याचा वापर करीत एकट्यानेच बोअर बनवायला सुरुवात केली. हा बोअर बनवितानादेखील ३ फूट एवढा अतिशय बारीक व्यास धरून त्याने खोदायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या प्रयत्नाला यश येऊ लागले आणि अतिशय कमी खर्चात शेतकºयांना हा मानवी बोअर हातांनीच करून देऊ लागला.
मदतीला पत्नी आणि एखादा मजूऱ यांच्या साहाय्याने तो हळूहळू बोअर खोल करीत जाऊ लागला आणि पाहता पाहता चक्क एकाच मापात १०० फुटांपर्यंत तो हे बोअर तयार करू लागला. जसजशी जमिनीच्या पोटात खोदाई करायला लागायची तशी प्रचंड उष्णता, कमी प्राणवायू अशा त्रासाला त्याला तोंड द्यावे लागे. पण आता गेल्या आठ वर्षात दत्ताला याची चांगलीच सवय होऊन गेली़ आज त्याच्या नावावर बलवडी गावात तब्बल ५६ बोअर तयार झाले. घूस जशी बीळ पडत जाते तसंच दत्तादेखील अगदी एका रेषेत खोलपर्यंत हे बोअर तयार करतो़ जमिनीच्या शेवटच्या स्तराला जेव्हा पाणी लागते तेव्हाच त्याच्या चेहºयावर समाधान पसरते.
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाºया बलवडीमधील शेतकरी दत्ताच्या या मानवी बोअरमुळे आता बागायती शेतीची स्वप्ने बघू लागले आहेत. आपल्या परिस्थितीमुळे जगण्यासाठी जीवावर उदार होऊन दत्ता करीत असलेल्या या कामामुळे आज बलवडीत त्याच्या बोअरमधील पाण्यामुळे शेततळी भरू लागली आहेत़ त्यामुळे बलवडी परिसरात डाळिंब बागासह इतर पिके जिवंत राहिली आहेत.
दत्ताने स्वत:च्या हाताखाली अजून ३ जणांना असे हातांनी बोअर पाडायला शिकवले आहे़ आता ही मंडळीदेखील परिसरात अशा पद्धतीचे बोअर खोदत आहेत.
त्याच बोअरवर भरू लागली शेततळी
- आज बलवडीतील डॉ़ अशोक कवडे यांनी दोन महिन्यांपूर्वी खोदलेल्या बोअरमधून आता आपले शेततळे भरून घ्यायला सुरुवात केली आहे. कायम दुष्काळी असलेली माझी जमीन आता बागायती होईल़ बलवडी भागात अनेक शेतकरी दत्तामुळे बागायतदार झाल्याचे ते सांगतात. मशीनने बोअर पाडल्यास शेतकºयाला सव्वा ते दीड लाख खर्च येतो, मात्र हेच काम दत्ता केवळ २५ हजारात करीत असल्याने शेतकºयांना दत्ताचे मानवी बोअर आपले वाटते.
स्वत:च्या शेतातील आड खोदून व्यवसाय करणार बंद
- वडिलांच्या आजारासाठी झालेल्या खर्चाची पूर्तता करताना दत्ता शिंदे यांना हे काम शिकावे लागले. सहावी पास, स्वत:जवळ केवळ ७१ गुंठे जमीन, घरी पत्नी आणि मुले यामुळे काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी हा आड खोदण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका आडासाठी पाच ते सहा हजार रुपये मिळायचे. त्यानंतर त्यांनी आसपासच्या गावातून ५६ आड खोदले. आता स्वत:च्या शेतात शेवटचा आड खोदून हा व्यवसाय बंद करण्याचा त्यांचा मानस आहे. कारण या आडात वर खाली करताना दम लागतो आणि त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.