कोयना परिसराला आतापर्यंत एक लाख वीस हजार धक्के !
By admin | Published: December 10, 2015 11:44 PM2015-12-10T23:44:59+5:302015-12-10T23:44:59+5:30
‘त्या’ भूकंपाला ४८ वर्षे पूर्ण : गुरुवारी सकाळीही सौम्य धक्का जाणवला
धीरज कदम -- कोयनानगरपाटण तालुक्यातील सर्वाधिक तीव्रतेच्या कोयना भूकंपाला शुक्रवार, दि. ११ रोजी ४८ वर्षे पूर्ण होत असतानाच गुरुवारी सकाळी याच परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ इतकी होती. दरम्यान, आतापर्यंत कोयना परिसराला एकूण एक लाख १९ हजार ९३४ इतके भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामधील पाच रिश्टर स्केलवरील धक्के हे नऊ होते हे विशेष आहे. कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. हे कोयना धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे १०५ टीएमसी इतकी आहे. या धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात येते. या वीजनिर्मितीमुळे राज्यातील अनेक गावे अन् शहरे उजळून निघाली आहेत. तसेच कोयना धरणातील पाण्याचा शेतीसाठीही फायदा होत आहे. अशा या कोयना धरण व परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
कोयना धरण झाल्यानंतर दि. ११ डिसेंबर १९६७ साली येथे भूकंपाचा ७ रिश्टर स्केलपेक्षाही जास्त तीव्रतेचा धक्का जाणवला. त्यावेळच्या भूकंपात कोयना व परिसरातील हजारो घरांचे नुकसान झाले होते. सुमारे १५० लोक मृत्यूमुखी पडले होते. ५० गावांचे पूनर्वसन करण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. त्यानंतरही या कोयना धरण परिसरात अनेकवेळा भूकंपाचे सौम्य, मध्यम असे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे कोयना व परिसर हे भूकंपाचे केंद्रच बनले असल्याचे दिसून येत आहे.
कोयना भूकंपाला ४८ वर्षे पूर्ण होत असतानाच आतापर्यंत या परिसराला एकूण एक लाख १९ हजार ९३४ इतके धक्के जाणवले आहेत. त्यामध्ये तीन रिश्टर स्केलपेक्षा लहान एक लाख १८ हजार १९७ धक्के जाणवले.
तीन पेक्षा अधिक व चार पेक्षा कमी रिश्टरचे १६३५, चार पेक्षा मोठे व पाच पेक्षा लहान रिश्टर स्केलचे ९३ धक्के जाणवले. त्याचबरोबरच पाचपेक्षा अधिक रिश्टर स्केलचे नऊ भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कोयना व परिसरात भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत असतात. तसेच पाटण, कऱ्हाड, सातारा इथपर्यंतही हे धक्के जाणवलेले आहेत.
जुन्या आठवणी ताज्या झाल्या...
गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास कोयना परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ इतकी होती. हा भूकंप कोयनेपासून १२ कि.मी अंतरावर आणि गोषटवाडीच्या नैऋत्येला ७ किमीवर झाला. तसेच या भूकंपाची खोली ९ कि.मी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. यामुळे मात्र, दि. ११ डिसेंबर १९६७ साली झालेल्या भूकंपाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.