...तर मी राजीनामा द्यायला तयार आहे; अमोल कोल्हेंचं 'भक्तां'ना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:03 AM2019-09-10T11:03:38+5:302019-09-10T11:15:52+5:30
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली असून ही यात्रा सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात पोहचली.
चंद्रपूर: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली असून ही यात्रा सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात पोहचली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी मी शिरुर खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास दोन- अडीच लाखांनी पुन्हा निवडून येईल असा विश्वास त्यांनी बल्लारपूर मतदारसंघातील भाषणात बोलून दाखविला.
अमोल कोल्हेंनी सांगितले की, माझ्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहेच, परंतु मी ईव्हीएम संर्दभात बोलायला लागलो की 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॅाट्सअॅपवर मेसेज पाठवून ईव्हीएमविषयी तुम्हाला शंका आहे तर, तुम्ही कसे निवडून आलात असे प्रश्न विचारतात. मात्र जर ईव्हीएम नसतं, तर शिरुरमधून एक शेतकऱ्याचा साधा पोरगा फक्त साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आला नसता असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मी राजीनामा देण्यास तयार असून आता ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास दोन-अडीच लाखांनी निवडून नाही आलो, तर माझं नाव बदला असं ओपन चॅलेंज अमोल कोल्हेंनी दिलं आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे प्रत्येक ठिकाणी उत्साहाने स्वागत केले जाते. मात्र भाजपाच्या महाजनादेश यात्रेत ठिकठिकाणी काळे झेंडे दाखविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेची जनआर्शिवाद यात्रा कुठे सुरु असेल तर मला नक्की कळवा असा टोला देखील त्यांनी शिवसनेला लगावला.