...तर मी कधीही शिवबंधन सोडू शकतो; शिवसेनेच्या माजी मंत्र्याची पक्षनेतृत्वावर नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 07:30 PM2020-01-03T19:30:36+5:302020-01-03T19:31:36+5:30
शिवसेनेत अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असताना त्यांना संधी देण्यात आली नाही.
कोल्हापूर - राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार नाराज असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेने रामदास कदम, दिवाकर रावते, दिपक केसरकर अशा नेत्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. शिवसेनेला मिळालेल्या १५ मंत्रिपदापैकी ३ मंत्रिपद घटकपक्षांना देण्यात आलं आहे. या संपूर्ण घडामोडींवर भाष्य करताना शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.
एबीपी माझाशी बोलताना दीपक सावंत म्हणाले की, सध्या तरी महाविकास आघाडीत आलबेल आहेत असं वाटतं, मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, सगळ्यांना दालनं मिळाली आहेत. मात्र गेल्या जानेवारी महिन्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. राजकारणात खूप गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मिळत नाही. जानेवारीपासून मला कोणतंही काम मिळालं नाही, मी कामासाठी भूकेला आहे. मी काम मागितलं होतं. पण कदाचित उद्धव ठाकरेंच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला काम दिलं नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
तर सध्या मी शिवसेनेचा नेता नाही, उपनेता नाही, विभागप्रमुख नाही माझ्या हातात फक्त शिवबंधन आहे, मी शिवसैनिक आहे. माझी गरज पक्षाला नसेल तर मला सांगावं, मी समाजसेवा करु शकतो. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय आता नाही. उद्धव ठाकरेंशी चर्चा करुनच मी निर्णय घेईन असं सांगत दीपक सावंत यांनी शिवसेना सोडण्याची तयारी दर्शविली आहे.
शिवसेनेत अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असताना त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पक्षातील आमदार नाराज आहेत. मंत्रिमंडळात समावेश न झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.