...तर कित्येकांची उपासमार रोखणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 05:11 AM2019-12-22T05:11:43+5:302019-12-22T05:12:30+5:30

आपण समाजात लहानाचे मोठे होतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाज

... so it is possible to prevent many starvation in mumbai | ...तर कित्येकांची उपासमार रोखणे शक्य

...तर कित्येकांची उपासमार रोखणे शक्य

Next

नितीन जगताप ।

आपण समाजात लहानाचे मोठे होतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाज आपल्याला काही ना काही देत असतो. यामुळेच आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो. मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवितो. या समाजाच्या ऋणांची जाणीव ठेवून काही जण त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. अशांपैकीच एक म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन. त्यांनी ‘रोटी बँक’ची स्थापना करून कुणाचीही उपासमार होऊनये, असा वसा घेतला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती करून घेण्याचा हा प्रयत्न...

प्रश्न : रोटी बँकची संकल्पना कशी सुचली?
उत्तर : गडचिरोलीमध्ये तीन वर्षे पोलीस उपमहानिरीक्षक होतो. त्या वेळी तेथील गरिबी, उपासमार, कुपोषण हे जवळून पाहिले. तसेच पोलीस सेवेत असताना रस्त्यावर राहणाऱ्या मुलांमुळे गुन्हेगारी कशी वाढते हेही पाहिलेले आहे. त्यातूनच पोलिसातील माणूस जागा झाला. गुन्हेगाराला शिक्षा होणे पुरेसे नाही. गुन्हेगारी कमी करण्यासाठी मुलांना प्रगतीच्या वाटेवर घेऊन जावे, असा विचार मनात आला. त्यांच्यासाठी ठाणे, गडचिरोली, चंद्रपूर येथे तीन शाळा सुरू केल्या. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करावे असा विचार सतावू लागला. कुपोषणामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो, त्यामुळे याकडे लक्ष द्यायला हवे असे वाटले. यातूनच रोटी बँक उदयाला आली. २७ डिसेंबर २०१७ रोजी एका व्हॅनसोबत रोटी बँक ही स्वयंसेवी संस्था सुरू करण्यात आली.

प्रश्न : रोटी बँकेचे काम कसे चालते?
उत्तर : ज्यांच्याकडे जास्त अन्न आहे त्यांनी संस्थेशी संपर्क साधायचा. २० ते ५० लोकांचे जेवण असेल तरी आम्ही गाडी पाठवतो. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे काम सुरू असते. लग्न, पार्टीचे जे जेवण असते ते उरल्यानंतर वाया जाते. पण तेच जेवण गरिबांना मिळते. कार्यालये, स्वयंपाकघरे यातील अतिरिक्त जेवण असेल तर संबंधित फोन करतात. ते अन्न गोळा केले जाते. त्याची तपासणी होते. नंतरच संस्था ते गरजू लोकांना वाटते. ६० ते ९० मिनिटांमध्ये अन्नाचे वाटप केले जाते. वितरित केलेल्या अन्नापैकी ९० टक्के ताजे तर १० टक्के लोकांकडून मिळालेले असते. टाटा कॅन्सर रुग्णालयात दररोज ४०० लोकांना जेवण देण्यात येते. दररोज एकूण तीन हजार जणांना जेवण दिले जाते.
प्रश्न : रोटी बँकेचा विस्तार कसा
होत आहे?
उत्तर : मुंबईत सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांत नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भार्इंदर, ठाणे येथे त्याचा विस्तार करण्यात आला. नुकतीच नागपूर येथेही रोटी बँक सुरू करण्यात आली आहे. लवकरच ती पुण्यालाही सुरू करण्यात येईल. शाळा, कार्यालये, सभांमध्ये या उपक्रमाबाबत आम्ही माहिती देतो. सामाजिक बांधिलकीचे भान राखत लोक मोठ्या प्रमाणात देणगी देतात. सुरुवातीला जुनी गाडी वापरून आम्ही याची सुरुवात केली होती. आता देणगीतून मिळालेल्या दहा गाड्या आहेत. आणखी ५ ते ६ गाड्या देण्यासाठी लोक तयार आहेत. जेवणासोबतच काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंची आरोग्य तपासणी, उपचारही केले जातात. येत्या काळात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणार आहोेत.

प्रश्न : जॉय आॅफ शेअरिंग काय संकल्पना आहे?
उत्तर : जॉय आॅफ शेअरिंगअंतर्गत बी-स्कूलमधील मुले स्वेच्छेने दोन चपाती जास्त आणतात. दररोज १२०० ते १६०० चपाती मिळतात. ते एका डब्यात आम्ही गोळा करतो. डाळ, भात, भाजी, फळे एकत्र जमवून गरीब मुलांना वाटतो.

प्रश्न : मोठ्या हॉटेलकडून
कसा प्रतिसाद मिळतो?
उत्तर : लग्न किंवा इतर कार्यक्रम रोज नसतात. पंचतारांकित हॉटेल, क्लब उरलेले अन्न हे खत बनविण्यासाठी वापरतात. आमच्या उपक्रमात सामान्य लोक मोठ्या संख्येने सहभाग घेतात. पण मोठ्या हॉटेलकडून रोटी बँकेला कोणतीही मदत मिळत नाही. अन्न दिल्यानंतर काही झाल्यास त्रास नको म्हणून अन्न देणे ते टाळतात. परंतु ही भूमिका बदलायला हवी. अन्नाचा तुटवडा असून सर्वांनी पुढाकार घेतल्यास कित्येकांची उपासमार रोखता येईल.

प्रश्न : पुढील लक्ष्य काय आहे?
उत्तर : अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. कुणीही उपाशीपोटी राहू नये हीच आमची तळमळ आहे. सुरुवातीला आम्ही हॉटेल, इतर स्वयंपाकघरात जेवण बनवत होतो. मात्र आता आम्ही आमचे स्वत:चे किचन सुरू करणार आहोत. पूर्वी आम्ही दररोज ३००० लोकांचे जेवण बनवत होतो, आता ६००० लोकांचे जेवण तयार करता येणार आहे. सध्या आम्ही वर्षाला सुमारे १० लाख लोकांना जेवण देत आहोत. २०२० या वर्षाला २० लाख लोकांना जेवण देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लोक, कंपन्या, बँका सामाजिक दायित्वातून मदत करत आहेत. कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्रश्न : लोक या उपक्रमाशी जोडले जात आहेत का?
उत्तर : हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शाळा, महाविद्यालयांत जागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत दहाहून अधिक शाळा जोडल्या गेल्या आहेत. मी स्वत: जाऊन शाळा, महाविद्यालये, सभांमध्ये याची माहिती देतो. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, विवेक ओबेरॉय, बोमन इराणी आदी जनजागृती करत आहेत.

Web Title: ... so it is possible to prevent many starvation in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.