.. तर आम्हालाही विधानसभेतून निलंबित करा!

By admin | Published: March 23, 2017 06:39 PM2017-03-23T18:39:40+5:302017-03-23T18:39:40+5:30

शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई होत असेल तर मग आम्हीसुद्धा

So, let us also get suspended from the Legislative Assembly! | .. तर आम्हालाही विधानसभेतून निलंबित करा!

.. तर आम्हालाही विधानसभेतून निलंबित करा!

Next
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 23  -  शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई होत असेल तर मग आम्हीसुद्धा या मागणीवर आक्रमक होतो. आम्हाला सुद्धा निलंबित करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांना पत्र लिहून केली.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, मागील 2 आठवड्यांपासून विरोधी पक्ष सातत्याने शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरतो आहे. दरम्यान, राज्याचा 2017-18 चा अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेचे निमित्त साधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 19सदस्यांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत निलंबित करण्यात आले. ही कारवाई सरकारने आकसपूर्ण पद्धतीने प्रस्तावीत केली होती. त्यामुळे निलंबनाच्या या अन्याय्य कारवाईबद्दल आमच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही कारवाई आकसपूर्ण व अन्याय्य असल्यासंदर्भात आमची भूमिका यापूर्वीच आपल्याकडे मांडली आहे. परंतु, 19सदस्यांवरील निलंबनाची कारवाई रद्द करणेबाबत सरकारकडून वा आपणांकडून कोणताही पुढाकार घेत असल्याचे दिसून येत नाही. सहकाऱ्यांवर निलंबनाची ही कारवाई आकसपूर्ण व अन्याय्य असल्याने सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याची भूमिका आम्ही यापूर्वीच आपल्याकडे मांडली आहे. विधानसभेतील 19सदस्यांचे निलंबन शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका मांडल्याने झाली आहे. तीच भूमिका त्याच आक्रमकतेने आम्ही देखील मांडली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने 19आमदारांचे निलंबन करण्यात आले, त्याच पद्धतीने आपण आमचे देखील त्याच कालावधीसाठी निलंबन करावे, असे या तीनही नेत्यांनी सदरहू पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, गुरूवारी दुपारी विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते व आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला दोन्ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आ. गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, शेकापचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, पीरिपाचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, एमआयएमचे इम्तियाज जलील, लोकभारतीचे आ. कपिल पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील बहुसंख्य आमदार उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी ग्रामीण भागातील वातावरण तापले असून, विरोधी पक्षांनी ही मागणी अधिक आक्रमकपणे लावून धरावी, अशा सूचना अनेक आमदारांनी यावेळी मांडली.

Web Title: So, let us also get suspended from the Legislative Assembly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.