...तर 'दबंग ३' चित्रपटाला रस्त्यावर उतरून विरोध करू; हिंदू जनजागृती समितीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:32 PM2019-12-18T17:32:25+5:302019-12-18T17:35:35+5:30
साधूंना नाचतांना दाखवणे, देवतांचे मानवीकरण करणे आदी गोष्टींतून हिंदू साधू आणि देवता यांचा अवमान करण्यात आला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या ‘दबंग 3’ या चित्रपटात हिंदू साधूंना हिडिसपणे आणि आक्षेपार्ह पद्धतीने नाचताना दाखवून त्यांचा घोर अवमान करण्यात आला आहे. या विरोधात हिंदू जनजागृती समिती आणि अन्य संघटनांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या 21 दिवस देशभरात आंदोलन करून चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची मागणी सेन्सॉर बोर्ड आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडे हिंदू संघटना सातत्याने करत आहे
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 17 डिसेंबरला पुन्हा मुंबईतील सेन्सॉर बोर्ड कार्यालयात जाऊन विभागीय अधिकार्यांची भेट घेण्यात आली. हिंदू समाज कदापि साधू-संतांचा अपमान सहन करणार नाही. तरी 20 डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह दृश्ये वगळली न गेल्यास आम्हाला आंदोलन आणखीन तीव्र करावे लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिला आहे.
याबाबत सुनील घनवट पुढे म्हणाले की, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटात जाट अन् राजपूत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या ‘सूरजमल महाराज’ यांच्याविषयी अवमानकारक प्रसंग व संवाद होते. ते लक्षात आल्यावर त्यांच्याविषयीचे 11 मिनिटांचे आक्षेपार्ह प्रसंग वगळ्याचे आदेश राजस्थान राज्याचे अतिरिक्त मुख्य गृहसचिव राजीव स्वरूप यांनी दिले. त्याचधर्तीवर ‘दबंग 3’ चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह प्रसंग वगळण्याचे आदेश महाराष्ट्राच्या अतिरिक्त मुख्य गृहसचिव यांनी द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच ‘दबंग 3’ या चित्रपटातील ‘हूड-हूड दबंग-दबंग’ या गाण्यात अनेक साधूंना पाश्चात्त्यांप्रमाणे हिडिसपणे नाचताना आणि गिटार वाजवताना दाखवले आहे. काही साधूंना त्यांच्या जटा गाण्याच्या चालीवर ठेका धरत उडवताना दाखवले आहे. तसेच सलमान खान यांना भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपातील पात्रे आशीर्वाद देतांनाही दाखवले आहे. अशाप्रकारे साधूंना नाचतांना दाखवणे, देवतांचे मानवीकरण करणे आदी गोष्टींतून हिंदू साधू आणि देवता यांचा अवमान करण्यात आला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून या चित्रपटाला विरोध करू अशी भूमिका हिंदू जनजागृती समितीने घेतली आहे. त्यामुळे चित्रपटातील एका गाण्यात अनेक आक्षेपार्ह प्रसंग असतील, तर संपूर्ण चित्रपटात किती प्रसंग असतील? म्हणून संपूर्ण चित्रपट हिंदूंना दाखवून हिंदूंच्या आक्षेपांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, तोपर्यंत चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये आणि चित्रपटही प्रदर्शित करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.