..तर मुंबईच्या नाड्या बंद करू, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 08:45 PM2023-11-02T20:45:43+5:302023-11-02T20:46:12+5:30
Manoj Jarange Patil: राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आठवडाभरापासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपलं उपोषण सोडलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील उपोषण सोडताना याबाबत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता जर सरकारने दगाफटका केला, तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. कोणत्या नाड्या बंद करायच्या तर आर्थिक आर्थिक नाडी बंद, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू. असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दोन महिन्यांची म्हणजेच दोन जानेवारीपर्यंतची मुदत देत आहोत. ही सरकारला देण्यात येणारी शेवटची मुदत असेल. या मुदतीत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे कूच करू सरकारच्या नाड्या बंद करण्यात येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.