तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही
By admin | Published: May 8, 2017 04:08 AM2017-05-08T04:08:51+5:302017-05-08T04:08:51+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार २०१७’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष रवींद्र साताळकर, कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष शाहू छत्रपती, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह आनंद भिडे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी १५ टक्के पाणी आपण अडवितो, १५ टक्के पाणी जमिनीत मुरते तर उर्वरित ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडविता आले पाहिजे. नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांचे चेक डॅम बनविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी अडविता येऊ शकेल.
नागपूर शहराचे सांडपाणी आम्ही विकून वर्षाला १८ कोटींचा महसूल मिळवीत आहोत. इतर शहरांनीही सांडपाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पुणेकरांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बांधकामासाठी वापरता येईल का याकडे लक्ष द्यावे असे गडकरी म्हणाले. वीज प्रकल्पांसाठी यापुढे धरणातील पाणी न वापरता सांडपाणी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. पर्यावण आणि विकास यांचा योग्य तो समतोल साधला पाहिजे. सामाजिक, आर्थिक परिवर्तन राजकारणातून झाले नाही तर ते केवळ सत्ताकारण उरते असे त्यांनी सांगितले.
१११ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करणार
जलमार्ग बांधण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ब्रम्हपुत्रा आणि गंगा या दोन नद्यांच्या जलमार्गाचे काम अग्रक्रमाने पूर्ण करण्यात येत आहे. त्याचबरोबर देशातील १११ नद्यांवर जलमार्ग बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती गडकरींनी दिली.
विद्वान जास्त असल्याने पुणे मागे
नागपूरचा वेगाने विकास होऊ शकला; कारण नागपुरात नेते अन् विद्वानही कमी आहेत. पुण्यात मात्र नेते आणि विद्वानांची संख्या जास्त असल्याने इथले विकास प्रकल्प रखडत असल्याचे सांगत गडकरी यांनी पुणेकर राजकारण्यांना आणि स्वयंसेवी संस्थांच्या विद्वानांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.