...म्हणून शिवसेना राजना नाही देणार टाळी
By admin | Published: January 30, 2017 11:48 AM2017-01-30T11:48:29+5:302017-01-30T12:04:29+5:30
शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बदललेले राजकीय संदर्भ लक्षात घेऊन मनसेने शिवसेनेकडे टाळी मागितली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बदललेले राजकीय संदर्भ लक्षात घेऊन मनसेने शिवसेनेकडे टाळी मागितली आहे. पण शिवसेना राज ठाकरेंना टाळी देण्याची शक्यता धुसर आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेले होते. शिवसेनेकडून नंतर कळवतो असे सांगण्यात आले आहे.
शिवसेना मनसेबरोबर आघाडीसाठी अजिबात इच्छुक नसल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीने शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. महत्वाचे म्हणजे मनसेने अशा आघाडीसाठी कुठली अटही ठेवली नसल्याची माहिती आहे. जागा वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना भाजपाची युती तुटल्यानंतर मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना-मनसे एकत्र येण्याविषयी चर्चा सुरु झाली होती.
पण शिवसेनेकडून मनसेला टाळी मिळण्याची शक्यता नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पाचवर्षापूर्वीची आता मनसेची स्थिती राहिलेली नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यामुळे मनसेची स्थिती सध्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीत युती करुन जास्तीत जास्त नुकसान टाळण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.
राज आणि उद्धव एकत्र आले तर इतिहास घडेल असे शिवसेना नेते मनोहर जोशींसह काही जणांचे मत आहे. पण सध्या तरी मातोश्रीची तशी इच्छा दिसत नाही तसेच शिवसेनेच्या नकारालाही राज ठाकरे निवडणूक प्रचारात मुद्दा बनवू शकतात.