...म्हणून भडकले आंदोलन

By admin | Published: June 23, 2017 01:58 AM2017-06-23T01:58:45+5:302017-06-23T01:58:45+5:30

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी धावपट्टी बांधण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी परिसरातील शेतजमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्याची भरपाईही दिली होती

... so stirred movement | ...म्हणून भडकले आंदोलन

...म्हणून भडकले आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी धावपट्टी बांधण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी परिसरातील शेतजमिनी ताब्यात घेतल्या होत्या. त्याची भरपाईही दिली होती. मात्र युद्ध संपल्यानंतर धावपट्टीचा वापर थांबला. स्वातंत्र्यानंतर या जमिनी शेतकऱ्यांनी परत मागितल्या. त्या देण्याचे आश्वासन मिळाले. पण निर्णय झाला नाही. दरम्यानच्या काळात संरक्षणाच्या कामासाठी विमानतळाचा वापर होत नसल्याने शेतकऱ्यांनी त्या जमिनी कसण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा सातबारा संरक्षण खात्याच्याच नावावर आहे. नवी मुंबईच्या विमानतळाला विरोध झाल्यावर पर्यायी जागेचा शोध सुरू होताच नेवाळीचा पर्याय पुढे आला; आणि या जमिनी परत मागण्याचे आंदोलन सुरू झाले.
जमिनी कसत असल्याने शेतकऱ्यांनी वहिवाट असल्याचे सांगत जागेवर हक्क सांगितला. पण ही जागा संरक्षण खात्याच्याच ताब्यात राहील, असे केंद्र सरकार, राज्य सरकारनेही स्पष्ट केल्याचे संरक्षण विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी स्पष्ट केले. या जमिनीत शेतकऱ्यांचा वावर वाढल्याने नौदलाने तेथे कुंपण घातले. पण त्याचा उपयोग न झाल्याने तेथे भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीच्या सीमांकनालाही विरोध झाला होता. भिंतीचे काम सुरू होताच आत जाऊन शेती करण्यास अडथळा सुरू झाला.
सध्या काही शेतकऱ्यांनी तेथे नांगरणी करून बियाणे पेरले. पण पावसाने ओढ दिल्याने त्याचा उपयोग झाला नाही. त्यातच नौदलाने भिंतीचे काम सुरू ठेवल्याने तेथील वावर बंद होईल म्हणून त्या कामाला विरोध वाढत गेला. त्यातूनच आंदोलन पेटले.
आधी विमानतळाचा प्रस्ताव, नंतर त्या भागात भोवताली सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या जमिनी ताब्यात मिळाव्यात, यासाठी काही नेत्यांनी शेतकऱ्यांना पुढे केल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. पण या विषयात ज्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप सुरू आहे, त्याला संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी आक्षेप घेतला होता.

दोघे अतिदक्षता विभागात 

भाल गावातून नेवाळी नाक्याच्या दिशेने निघालेल्या मोर्चावर लाठीमार होईल, असे समजताच मोर्चेकऱ्यांनी एक चार चाकी गाडी जाळली. रस्त्यावर दगड टाकून, टायर जाळत वाहतूक रोखली. जमाव हिंसक होत गेल्याने, लाठीमार करूनही तो पांगत नसल्याने आणि त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवल्याने पोलिसांनी जमावाच्या दिशेने छर्ऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्यात साईनाथ चिकणकर, मुकेश कोळेकर, भूपेश म्हात्रे, किरण सोरखादे, सूरज मोरे, सोमनाथ चिकणकर, संदीप म्हात्रे, मनोज म्हात्रे, मिलन चिकणकर, हृतिक म्हात्रे, हृषीकेश म्हात्रे, भाऊ म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे हे जखमी झाले.

‘लोकमत’च्या छायाचित्रकाराचे फोटो केले नष्ट
आंदोलनाच्या ठिकाणी फिरून ‘लोकमत’चे छायाचित्रकार आनंद मोरे फोटो काढत होते. मात्र त्यात आपले चेहरे दिसतील, या कारणाने काही तरुणांनी त्यांना विरोध केला. त्यांचा कॅमेरा ताब्यात घेतला आणि त्यातील फोटो त्यांना डीलीट करायला लावले. आमचे फोटो कशाला काढता, जखमींचे काढा, असे त्यांचे म्हणणे होते.

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा 
शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांनी जाळपोळ सुरू केली. नंतर पोलिसांवर हल्ला केला. त्यांना मारहाण केली. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यानी दिली. 

मंत्री, आमदार, खासदारांची भेट 
पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमींची विचारपूस केली. या जमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी ७५ वर्षे आंदोलन सुरू आहे. पण निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष आहे. त्यामुळे संरक्षण राज्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. खासदार शिंदे यांनीही केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. नौदलाच्या भिंतीला न्यायालयात आव्हान दिल्याने भिंतीचे काम थांबणे अपेक्षित होते. ते न झाल्याने उद्रेक झाल्याचे कथोरे म्हणाले.

Web Title: ... so stirred movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.