...तर घटस्फोट घ्या!

By Admin | Published: February 10, 2017 01:51 AM2017-02-10T01:51:00+5:302017-02-10T01:51:00+5:30

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी

So take a divorce! | ...तर घटस्फोट घ्या!

...तर घटस्फोट घ्या!

googlenewsNext

सध्याची निवडणूक एक प्रकारे आरपारची लढाईच झाली आहे. प्रत्यक्षात गोळीबार वा तलवारबाजी होत नसली, तरी (काही ठिकाणी तीही होते!) बाकी लढाईतील सर्व कावे-बारकावे आणि आयुधांचा लीलया वापर करून, विरोधकांना नामोहरम करण्याची संधी सोडली जात नाही. गुजरातेतील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली भेट हा अशाच गनिमीकाव्याचा प्रकार म्हणता येईल. अन्यथा, एरव्ही गुजरातींच्या नावे बोटे मोडणाऱ्यांना या गुजराती पोऱ्याबद्दल ‘हार्दिक’ प्रेम उचंबळून येण्याचे काही कारण नाही.
शिवसेनेचा पूर्वेतिहास जसा मराठी माणसांसाठी लढण्याचा आहे, तसाच तो तडजोडींचा देखील आहे. मागे वळून पाहिले, तर शिवसेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध पुकारलेले आंदोलन आठवते. तसे १९७८ सालात बाळासाहेबांनी द्रमुकचे नेते करुणानिधी यांची मुंबईत घेतलेली भेटही आठवते. कडव्या मुस्लिमांच्या विरोधात केलेली गर्जना आठवते, तशी १९७९ सालात कडव्या मुस्लीम लीगच्या बनातवाला यांच्यासोबत केलेली युतीही आठवते. पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंच्या विरोधात घेतलेली भूमिका आठवते आणि जावेद मियाँदाद याचा ‘मातोश्री’वर झालेला पाहुणचारदेखील आठवतो. एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची घोषणा आठवते, तशी त्याच कंपनीच्या रिबेका मार्क यांनी ‘मातोश्री’वर झाडलेली पायधूळदेखील आठवते. मायकेल जाक्सन, गुलाम अलीही आठवतात... तात्पर्य, आडात एक आणि पोहऱ्यात दुसरे!
गुजराती समाज आणि शिवसेना यांचं तर विळ्या-भोपळ्याचं नातं! संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून शिवसेना या समाजाला कायम पाण्यात पाहत आली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार, अशी हाळी देत सेनेने गुजराती समाज आणि तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याविरुद्ध आंदोलन छेडले. हे भांडण पुढे सीमाप्रश्नाच्या लढ्यापर्यंत कायम राहिले. १९६९ सालात उपपंतप्रधान पदावर असलेले मोरारजी मुंबई दौऱ्यावर आले असता, त्यांची गाडी अडविण्यावरून झालेला राडा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मोरारजींबद्दल शिवसेनेला असलेला राग मुंबई आणि मराठी माणसांसाठी होता, हे खरेच, पण पुढे तो समाजावरही काढण्यात येऊ लागला. अगदी कालपरवापर्यंत ‘शाकाहारी विरुद्ध मांसाहारी’ असा वाद निर्माण करून गुजराती बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्याचा एक कलमी कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला होता.
गुजरातींच्या विरोधात शिवसेनेने कधी काळी ‘मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची’ अशी हाक दिली होती. मुंबई महाराष्ट्रातच राहिली, पण मराठी टक्का कमी झाला. ज्या परप्रांतीयांच्या विरोधात सेना लढत राहिली, आज त्यांचाच टक्का वाढत गेल्याने खम्मण ढोकळा खाऊन लुंगीने तोंड पुसण्याची पाळी सेनेवर आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही स्वाभिमानी मावळ्यांची सेना होती. तिथे जातपात नव्हती. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच संघटना उभी राहिली. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, ‘घाटी-कोकणी, ब्राह्मण, ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर हे सारे भेद गाडून टाकून महाराष्ट्रासाठी म्हणून एक व्हा!’ आज ते हयात असते तर त्यांनी जातीपातींचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा ‘मातोश्री’वरून कडेलोटच केला असता. उद्धव म्हणतात, फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ’ आजच्यापेक्षा योग्य वेळ आणखी कोणती? या सत्तेत मन रमत नसेल, वागणं पटत नसेल, तर कसली वाट पाहता? सरळ घटस्फोट घेऊन मोकळे व्हा!
- नंदकिशोर पाटील

Web Title: So take a divorce!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.