...तर सुप्रिया सुळेंचा पराभव अटळ; भाजपाच्या 'मिशन बारामती'ला महादेव जानकरांची साथ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 12:39 PM2022-08-07T12:39:00+5:302022-08-07T12:39:30+5:30
शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे असं जानकरांनी म्हटलं.
नवी दिल्ली - आगामी २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने भाजपानं तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. त्यात शरद पवारांचं वर्चस्व असलेल्या बारामतीवर भाजपानं लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीच्या दौऱ्यावर असल्याने या चर्चेला उधाण आले आहे. त्यात आता महादेव जानकर यांनीही जर योग्य प्लॅनिंग केले तर राष्ट्रवादीचा पराभव अटळ आहे असं सांगत भाजपाला सल्ला दिला आहे.
महादेव जानकर म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर एकाबाजूला धरण आणि दुसऱ्याबाजूला पाण्यासाठी घशाला कोरड पडली अशी अवस्था आहे. इंदापुर तालुक्यातील ३२ आणि बारामतीतील २६ गावांच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे. मुळशी, दौंड याठिकाणीही समस्या प्रलंबितच आहे. निर्मला सीतारामन या बारामतीत लक्ष देत असतील तर त्यांचं अभिनंदन आहे. बारामतीच्या जनतेचे माझ्यावर उपकार आहेत. मला पावणे पाच लाख मतदान केले होते. भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. भाजपानं रासपला हा मतदारसंघ द्यायला हवा होता. २०१९ मध्ये भाजपाच्या उमेदवाराला माझ्याएवढे मतदान झाले नव्हते हेदेखील पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे. उमेदवारांच्या दृष्टीने भाजपाने एकाच व्यक्तीवर फोकस ठेवला पाहिजे हा माझा सल्ला आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे. खडकवासला शहरी भाग असून विकास नाही. पुरंदरची अवस्था आजही वाईट आहे. जर व्यवस्थित प्लॅनिंग केले तर बारामतीत लोकसभेतही परिवर्तन घडू शकतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही पराभूत होतात त्यामुळे बारामतीत अशक्य असं काही नाही. शरद पवारांच्या दबावाला कुठल्याही राजकीय पक्षाने बळी पडू नये. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बारामतीबाबत कुठलीही चर्चा नाही. २०१९ मध्ये ती जागा मागितली होती परंतु दिली नाही. भाजपानं रासपला जागा दिली तर ती जागा लढवण्यास तयार आहे असं महादेव जानकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.