... तर शरद पवार यांच्यावर टीका-टिप्पणी करण्याशिवाय पर्याय नाही: भाजप नेत्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:36 PM2021-02-01T14:36:32+5:302021-02-01T14:43:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, कारण ती आमची संस्कृती आहे...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच कारण ती आमची संस्कृती आहे. पण भारतीय जनता पार्टीला जर पश्चिम महाराष्ट्रात आपले काम वाढवायचे असेल तर शरद पवार यांच्यावर टीका करण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही, अशी कबुली खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. पाटील म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते समोर आले की मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. पण शरद पवार यांच्यावर आम्ही टीका करत असलो तरी राजकारणात मैत्री असायलाच हवी.
शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊच शकत नाही असे वेळोवेळी बोलले जाते. तसेच देश किंवा राज्यातील राजकारणात ते नेहमीच केंद्रस्थानी राहिलेले पाहायला मिळाले आहे. आजपर्यंत पवारांनी अनेक मातब्बर नेते राज्याला दिले आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्ष देखील पवार यांचे मत व मार्गदर्शनाला गांभीर्याने घेत असतात.
सर्वांनाच दिलासा देणारा अर्थसंकल्प..
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वांना आनंद आणि दिलासा देणारा आहे. तसेच कोरोनामुळे आर्थिक गाडा खाली उतरला असताना तो गाडा रुळावर आल्याचे या अर्थसंकल्पावरून स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज मर्यादा वाढवली. उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन बजेटमध्ये आहे. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 40 हजार कोटी दिले आहे. या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.