...म्हणून अडीच हजार कुटूंबाचे रेशन, पाणी बंद
By Admin | Published: August 24, 2016 09:28 PM2016-08-24T21:28:56+5:302016-08-24T21:28:56+5:30
महापालिका हद्दीतील सुमारे अडीच हजार कुटूंबांना वारंवार विनंती करूनही वैयक्तिक शौचालय बांधलेली नाही. यातील २६६ जणांनी तर पालिकेकडून शौचालयाचे अनुदानही उचलले आहे.
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 24 : महापालिका हद्दीतील सुमारे अडीच हजार कुटूंबांना वारंवार विनंती करूनही वैयक्तिक शौचालय बांधलेली नाही. यातील २६६ जणांनी तर पालिकेकडून शौचालयाचे अनुदानही उचलले आहे. त्यामुळे आता महापालिकेने या अडीच हजार कुटूंबांचे धान्य, वीज, पाणी व गॅस बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी बुधवारी पालिकेच्या आरोग्य विभागाला तसे आदेशही दिले.
आयुक्त खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून स्वच्छतेच्या कामाला महत्व दिले आहे. खुद्द आयुक्तांनी शहरातील झोपडपट्ट्यात स्वच्छता मोहिम राबवून नव्या उपक्रमाला सुरूवात केली आहे. त्यात शासनाकडूनही स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीचे आदेश पालिकेला प्राप्त झाले आहे. बुधवारी दुपारी आयुक्तांनी सर्व स्वच्छता निरीक्षक, वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत वैयक्तिक शौचालय योजनेचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त खेबूडकर म्हणाले की, महापालिका हद्दीतील २६६ जणांनी शौचालयाचे अनुदान घेतले आहे. पहिला सहा हजाराचा हप्ता देऊनही या कुटूंबांनी अजून बांधकाम सुरू केलेले नाही. गेल्या आठ महिन्यापासून ही प्रक्रिया रखडली आहे. मध्यंतरी या कुटूंबांना १५ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण तरीही त्यांनी शौचालये बांधलेली नाहीत. या कुटूंबाना एकूण १६ लाखाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. पालिकेकडून या कुटूंबावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी चालविली होती.
शहरात अजून दोन हजार कुटूंबे उघड्यावर शौचालयास जात आहेत. त्याची यादीही आरोग्य विभागाकडे तयार आहे. या सर्व कुटूंबांचे पाणी कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया लवकरच पाणीपुरवठा विभागाकडून सुरू होईल. वीज मंडळ व गॅस एजन्सीला पत्र देऊन या कुटूंबाचे वीज व गॅस बंद करण्याची विनंती केली जाणार आहे. शिवाय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वस्त धान्य दुकानातील धान्य पुरवठाही रोखला जाणार आहे. पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना तातडीने पत्र तयार करून ते संबंधित विभागाला पाठविण्याचे आदेशही दिल्याचे खेबूडकर म्हणाले.