…म्हणून जोरदार प्रतिसादानंतरही वज्रमुठ सभा थांबवल्या, अखेर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:45 PM2023-05-04T14:45:19+5:302023-05-04T14:46:02+5:30
Uddhav Thackeray : केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभांच्या माध्यमातून जोरदार आघाडी उघडली होती. राज्याच्या विविध भागांत झालेल्या या वज्रमुठ सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता.
केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभांच्या माध्यमातून जोरदार आघाडी उघडली होती. राज्याच्या विविध भागांत झालेल्या या वज्रमुठ सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तसेच त्यातून महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यातील ऐक्यही दिसून येत होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील वज्रमुठ सभा रद्द करण्यात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील वज्रमुठ सभा स्थगित करण्यामागचं नेमकं कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,वज्रमुठ सभा ह्या मे महिना आणि जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत घेण्याचं नियोजन होतं. त्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. मा्त्र या सभा संध्याकाळी जरी घेतल्या जात असल्या तरी दुपासपासून लोक येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी जे काही घडलं. त्या पार्श्वभूमीवर सभा सुरू ठेवणं योग्य ठरलं नसतं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडीला तडा जाईल, अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाही, त्याबाबतची काळजी मी घेईन, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करून सांगितलं.