...म्हणून वसंतदादा लोकांच्या हृदयात राहिले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:59 AM2017-10-02T03:59:37+5:302017-10-02T04:00:04+5:30
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत
मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७०वा वर्धापन दिन आणि वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समारोपानिमित्ताने परळमध्ये आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की, वसंतदादा यांच्या साधेपणात मोठेपणा होता. ते नेहमीच स्पष्ट बोलत. सत्ता टिकविण्यासाठी त्यांनी कधी अट्टाहास केला नाही. उलट प्रसंगी सत्ता सोडण्यासाठी त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. कोणताही निर्णय धाडसाने घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. या वेळी आरएमएमएसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनीही वसंतदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. अहिर म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी आरएमएमएसचे अध्यक्षस्थान भूषवून संघटनेला नवी दिशा प्राप्त करून दिली. १९८२ च्या संपात बंद पडलेल्या मुंबईतील १३ गिरण्या त्या वेळच्या केंद्र सरकारला ताब्यात घेण्यास भाग पाडून हजारो कामगारांचे उद्ध्वस्त संसार वाचविले. मुंबईतील गिरणी कामगारापासून माथाडी कामगारांपर्यंतच्या सर्वच कामगारवर्गाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आंबेकर श्रम संशोधन संस्थेद्वारे ‘मानव विकास व्यवस्थापन आणि उद्योगातील सातत्य’ या विषयावर नोकरीभिमुख अभ्यासक्रम सुरू करून राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची ग्वाही संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी दिली. मोहिते यांनी संघटनेच्या प्रदीर्घ वाटचालीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला. तर लोकनेते वसंतरावदादा पाटील सोशल फ्रंटचे अध्यक्ष यशवंत हाप्पे यांनी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा दिला.