...तर जनतेने कोणाकडे पाहायचे?
By admin | Published: December 5, 2014 03:56 AM2014-12-05T03:56:56+5:302014-12-05T03:56:56+5:30
मरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड घेण्यावरुन पोलिसांनी असमर्थता दर्शवली असली तरी त्यावर सर्वच पक्षात टीका होऊ लागली आ
अतुल कुलकर्णी, मुंबई
मरीन ड्राईव्हवर प्रजासत्ताक दिनाची परेड घेण्यावरुन पोलिसांनी असमर्थता दर्शवली असली तरी त्यावर सर्वच पक्षात टीका होऊ लागली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, त्यांचे ते कामच आहे. ते देखील होत नसेल तर जनतेने पाहायचे कोणाकडे अशा शब्दात राजकीय पक्षांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे.
गतवर्षी पासून मरीन ड्राईव्हवर सुरु झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व कोणी करायचे हा मुद्दा महत्त्वाचा नाही त्याहीपेक्षा देशासाठी ज्यांनी कर्तव्य बजावत प्रसंगी आपले प्राण दिले त्यांची माहिती नव्या पिढीला कळायला हवी या हेतूने या परेडकडे सगळ्यांनीच पाहावे. यातून आपलेपणाची भावना वाढीस लागते हे पोलिसांनी देखील विसरु नये अशी प्रतिक्रिया देत शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मरीन ड्राईव्हवर परेड करण्याचे समर्थन केले आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. गेल्या वर्षी जर दिमाखात ही परेड मरीन ड्राईव्हवर होऊ शकते तर यावर्षी का नाही, असे सांगून काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या वर्षीपासून देशभक्ती जागवण्याचे काम करणारी सुरु झालेली परंपरा याही वर्षी चालू राहिली पाहिजे अशी मागणी केली आहे. तर १९७० च्या दशकात आपण शाळेत असताना चौपाटीवर परेडसाठी जात होतो असे सांगून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, दिल्लीनंतर मुंबईच्या परेडने गेल्या वर्षी
देशात महाराष्ट्राची मान ताठ केली होती. देशभक्तीच्या गोष्टी करणाऱ्या भाजपा सरकारने याबाबतीही बाणेदारपणा दाखवावा, असे आव्हानही मलिक यांनी
केले.