"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 07:47 PM2024-11-02T19:47:41+5:302024-11-02T19:48:49+5:30
चार तारखेला मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
आमची सहन करण्याची क्षमता संपली आता परिवर्तन होणार, गोरगरिबांच्या लेकराला न्याय देणारी ही लाट आहे, असे म्हणत, मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता 3 तारखेला कोणत्या जागी कोणता उमेदवार हे ठरले जाईल, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. अर्थात ते उद्या या संदर्भात घोषणा करणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जरांगे भाजप विरोधात उमेदवार देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आता, चार तारखेला मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, "लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढवण्याचा आणि उमेदवार देण्याचा अधिकार आहे. जरांगे हेदेखील उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. मात्र, केवळ संकुचित भावनेने केवळ भारतीय जनता पार्टीसमोरच उमेदवार उभे केले गेले अथवा भाजपचे उमेदवार आहेत, तेथे पाडापाडीच्या उद्देशाने दुसऱ्या महाविकास आघाडीला समर्थन केले, तर जरांगेंचा बोलवता धनी कुणीतरी आहे, हे जे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो, त्यावर शिक्कामोर्तब होईल." ते टीव्ही९ सोबत बोलत होते.
जरांगे यांच्या हेतूसंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, "चार तारखेला फॉर्म मागे घेईपर्यंत, कोणत्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत, कोणत्या ठिकाणी नाहीत? ज्या ठिकाणी उभे आहेत, तेथे उमेदवार कोण आहेत? जेथे उभे करणार नाहीत, तेथे उमेदवार कोण आहेत? हे समोर आल्यानंतर, जरांगेंचा नेमका उद्देश काय? त्यांची निष्पक्षपाती भूमिका मराठा समाजासाठी आहे की, आता त्यांची भूमिका पूर्ण पणे राजकीय बनली आहे, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल."