...तर मानहानीचा दावा दाखल करणार, मंत्री दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 07:21 PM2023-10-10T19:21:03+5:302023-10-10T19:26:48+5:30

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  यांनी केला.

...So will sue for defamation, Minister Dada Bhuse's warning to Sushma Andhara | ...तर मानहानीचा दावा दाखल करणार, मंत्री दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा 

...तर मानहानीचा दावा दाखल करणार, मंत्री दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा 

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यावरून सध्या राजकारण सुरु आहे. ललित पाटील हा काही दिवसांपूर्वी ससूनमधून फरारी झाला होता. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  यांनी केला. यावर दादा भुसे यांनी भाष्य करत आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा केला आहे. तसेच, चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास सुषमा अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही दादा भुसे म्हणाले. 

सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर हा आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांनी ऐकीव माहितीवर आरोप केले. त्यांच्याकडे पुरावे किंवा ठोस माहिती नाही, सुषमा अंधारेंनी माहिती घेऊन आरोप करावेत. माझे कॉल रेकॉर्ड चेक करावेत, त्यासंबंधित सर्वांचे कॉल रेकॉर्डे चेक करावेत. असे आरोप करणे म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवण्यासारखे आहे. चौकशीत सत्य समोर येईल आणि नंतर आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्यास मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे दादा भुसे म्हणाले.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या आधी पुण्यातील कसबा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा आरोप केला होता. ड्रग्स माफिया ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला होता. मात्र, यावेळी त्यांनी कोणत्याही मंत्र्याचे नाव घेतले नाही. पण सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे यांचे नाव घेतल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.

३० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विभागाने ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एम डी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित पाटील  आणि त्याचा भाऊ भूषण पाटील असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. ललित पळाल्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या शोधार्थ पाठवण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी भूषण पाटील याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील वाराणसीतून पकडले. भूषण पाटलासह त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला देखील ताब्यात घेतले आहे.

Web Title: ...So will sue for defamation, Minister Dada Bhuse's warning to Sushma Andhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.