सुषमा अंधारेजी, रडण्याची नौटंकी बस्स करा, तुमच्यामुळे...; तृप्ती देसाईंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 02:56 PM2023-10-20T14:56:18+5:302023-10-20T14:57:05+5:30
तुम्ही राजकारणात आहात, यापुढेही अनेक अडचणी येतील. त्यामुळे महिला नेत्या म्हणून चांगले काम करा. पण ही नाटके तुम्ही थांबवली पाहिजेत असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.
मुंबई – एकदा सुषमा अंधारे रडल्या, तेव्हा सहानुभूती वाटली. वाईट वाटले, एखाद्या महिलेला राजकारणात रडावं लागलं असं वाटले. परंतु दरवेळीच डोळे दाबून दाबून खोटे अश्रू आणायचे आणि नौटंकी करायची, सुषमा अंधारेंनी हे बस्स करावं, त्यांनी सुधारावं. कारण इतर महिला राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन जनतेचा वेगळा होतोय अशा शब्दात सामाजिक महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात आणि त्या राजकारणात मोठ्या प्रमाणात याव्यात अशी माझ्यासारख्या महिला कार्यकर्त्यांची मागणी आहे. मला त्याचा अभिमान वाटेल. परंतु सुषमा अंधारे या जेव्हा शिवसेनेत आल्या. खरेतर त्यांनी बाळासाहेबांवर आणि उद्धव ठाकरेंवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यात पक्षात त्या गेल्या. काहीतरी चांगले पद हवंय म्हणून वारंवार नौटंकी करताना दिसतात. सध्या नवरात्र सुरू आहे. ज्या देवीला त्यांनी नावं ठेवली. तिथेच ज्या जातात आणि स्वार्थासाठी मी किती देवीभक्त आहे हे दाखवतात. त्या देवाला मानतच नाही तरीही वारीत सहभागी झाल्या त्या स्वार्थासाठी हे करतात असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत ललित पाटील प्रकरणी त्याला अटक झाली, त्यावर देवेंद्र फडणवीसांनी विधान केले. आता अनेकांचे तोंड बंद होतील. ते सुषमा अंधारेंना लागूही नव्हते. परंतु स्वत: पत्रकार परिषद घ्यायची, ओढवून घ्यायचं, महिला कार्ड खेळायचे. लहान मुलं आहे सांगायचे. अहो सर्वांना मुले आहेत. आमच्यावरही हल्ले झाले, महिला नेत्या सगळ्या पक्षात चांगले काम करतायेत. त्यांनाही मुले आहेत. परंतु असं खोटे अश्रू आणून कुणीच राजकारण करत नाही. त्यामुळे हे थांबवले पाहिजे असं तृप्ती देसाईंनी म्हटलं.
दरम्यान, तुम्ही राजकारणात आहात, यापुढेही अनेक अडचणी येतील. त्यामुळे महिला नेत्या म्हणून चांगले काम करा. पण ही नाटके तुम्ही थांबवली पाहिजेत. कारण आम्हाला जनता म्हणून हे अजिबातच सहन होत नाही असा सल्लाही तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांना दिला. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी डोळ्यात पाणी आणून मला धमकावता, घाबरवता, मला ६ वर्षाची मुलगी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस, शंभुराज देसाईंवर टीका केली होती. याआधीही अजित पवारांवर टीका करताना सुषमा अंधारे यांनी शरद पवारांसमोरच अश्रू ढाळले होते. त्यामुळे या प्रकारावर तृप्ती देसाईंनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.