‘चॅटिंग’चे सोशल व्यसन

By admin | Published: January 22, 2017 12:56 AM2017-01-22T00:56:04+5:302017-01-22T00:56:04+5:30

तंत्रज्ञानाच्या आभासी जगामुळे खऱ्याखुऱ्या जगण्याची नाळ तुटत चालल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. नात्यातील कोरडेपणा, पिढ्यांमधील वाढते अंतर, वाढता आत्मकेंद्रीपणा

'Social addiction of chatting' | ‘चॅटिंग’चे सोशल व्यसन

‘चॅटिंग’चे सोशल व्यसन

Next

- स्नेहा मोरे

तंत्रज्ञानाच्या आभासी जगामुळे खऱ्याखुऱ्या जगण्याची नाळ तुटत चालल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. नात्यातील कोरडेपणा, पिढ्यांमधील वाढते अंतर, वाढता आत्मकेंद्रीपणा अशा अनेक समस्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरीनेच डोके वर काढत आहेत. त्यामुळे या डिजिटल युगात उद्भवणाऱ्या मनोविकारांविषयी माहिती देणारे डिजोफ्रेनिया हे सदर महिन्यातून एकदा...
खूप वेळ कुणाशी चॅटिंग नाही केल्यावर अस्वस्थ वाटते का?, कुणीच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर पोक न केल्याचा राग येतो का? तरुणाईतील ही वेगळ््या प्रकारची अस्वस्थता दिवसागणिक वाढताना दिसते आहे. बऱ्याचदा ‘फिलिंग नॉस्टेलजिक..’, ‘हॅविंग फन विथ फ्रेंड्स’, ‘डू मिस मी गाइज्..’ या किंवा अशाच काहीशा चॅटिंग मेसेजेस्ने प्रत्येकाचाच दिवस सुरू होतो आणि रात्र संपते (?) म्हणजे ती संपत नसते, कारण रात्री चादरीच्या पलीकडे लपून-छपून चॅटिंग सुरूच असते. अलीकडच्या काळात जगण्याचा अविभाज्य भाग झालेल्या या सोशल चॅटिंगने एकमेकांतील संवादाची दरी मिनिटागणिक वाढतेच आहे. त्यात जगभरात रोजच्या रोज नव्याने चॅटिंग अ‍ॅप्स, सोशल साइट्सची भर पडल्याने, भविष्यात ही संवादांची नाळ अधिकच तुटत जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी केवळ संभाषणापुरता मर्यादित असणाऱ्या मोबाइल फोन्सने प्रत्येक घरात शिरकाव केला, केवळ तेवढ्यावर हे थांबले नाही तर काही वर्षांपासून घरातील सदस्यांपेक्षा स्मार्ट फोन्सची संख्या वाढत गेल्याचे प्रमाण दिसत आहे. समाजातील याच बदलाने प्रत्येक व्यक्तींतील संवादाचे पूल हरवत गेले. यामुळेच तीन वर्षांच्या लहानग्यापासून ते साठीच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वच जण ‘व्हर्च्युअल’ जगात जगू लागले. आपण जगत असलेला प्रत्येक क्षण ‘शेअर’ करण्यातच आनंद मानणाऱ्या पिढीचे भावविश्व एका मुठीत मावणाऱ्या मोबाइलने कैद केले.
ई-व्यसनातील सोशल ‘चॅटिंग’च्या अति-वापरानेच निद्रानाश, एकलकोंडेपणा, नकारात्मक भावना, अलिप्तता अशा असंख्य आजारांना समाजातील बहुतांश लोकांना सामोरे जावे लागत आहे. आजच्या घडीला तरुणपिढीमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. परिणामी, प्रौढावस्थेत याचे दुष्परिणाम अभ्यासावर तर त्यानंतर टप्प्या-टप्याने करिअर, नोकरी, नातेसंबंधांवर होताना दिसताहेत. तरुण पिढीच्या मानसिक स्वास्थ्यावरही याचा दूरगामी परिणाम दिसत असून, मोठ्या प्रमाणात ही तरुणाई नैराश्येच्या गर्तेत अडकल्याचेही दिसते आहे. शिवाय, प्रत्येकाची जीवनशैली गतिमान झाल्याने चॅटिंगच्या दुष्परिणामांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे.
तरुणपिढीमधील ‘चॅटिंग’ अ‍ॅडिक्शनमुळे ही पिढी आत्मकेंद्री होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर वाढणे, संवाद कमी होणे अशा समस्या उद्भवत आहेत.
आता या पिढीला ‘टेक्नोसॅव्ही’ होण्याच्या ध्यासाने याचे महत्त्व समजत नाही. मात्र, यामुळे तरुणाईच्या मानसिक स्वास्थ्यावर याचा दूरगामी परिणाम होतोय, हे लक्षात घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांत चॅटिंग अ‍ॅडिक्ट झालेल्या तरुणपिढी समुपदेशनाकडे वळत आहे. त्यामुळे टेक्नोलॉजीचा सर्रास वापर न करता, ‘स्मार्ट’ वापर करण्यावर तरुणाईने भर दिला पाहिजे, शिवाय केवळ ‘व्हर्च्युअल संवाद’ न साधता, मित्रपरिवार, आप्तेष्टांशी भेटून बोलण्यावर भर देण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ मानसोपरचारतज्ज्ञ डॉ. युसूफ माचिसवाला यांनी सांगितले.

Web Title: 'Social addiction of chatting'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.