सामाजिक बांधिलकीचा हीरक महोत्सव
By Admin | Published: August 23, 2016 01:44 AM2016-08-23T01:44:16+5:302016-08-23T01:44:16+5:30
लोकमान्य टिळकांच्या विचारधारेने प्रेरित होऊन १९५७ साली स्थापन झालेल्या जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६०वे वर्ष आहे.
रोहित गुरव,
मुंबई- लोकमान्य टिळकांच्या विचारधारेने प्रेरित होऊन १९५७ साली स्थापन झालेल्या जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६०वे वर्ष आहे. स्थापनेपासूनच हे मंडळ लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सवाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. गणेशोत्सवादरम्यान सजावटीद्वारे दिला जाणारा सामाजिक संदेश आणि शिस्तबद्धता यामुळे मंडळाला विविध स्पर्धांमध्ये गौरविण्यात आले आहे.
यंदा मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने आगमनाला खास पारंपरिक ढोल पथकाला निमंत्रित केले आहे. भरगच्च कार्यक्रमांच्या आखणीत विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे.
>मंडळाच्या शिरपेचात पारितोषिकाचा तुरा
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान देखाव्यातून विविध सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते. गेल्या काही वर्षांत स्त्रीभ्रूणहत्या, पाणी वाचवा असे समाजोपयोगी संदेश देखाव्यातून देण्यात आले आहेत. २०१२ सालच्या ‘स्त्रीभ्रूणहत्या’ या मंडळाच्या देखाव्याला लोढा फाउंडेशन आयोजित स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच दादर पोलीस ठाणे अंतर्गत स्पर्धेत ‘शिस्तबद्ध मंडळा’चा मानही मिळाला आहे.
>स्वच्छता अभियान : स्वच्छता अभियान संकल्पना घेऊन जनजागृती केली जाणार आहे. या संकल्पनेला धरून उत्सवादरम्यान देखावा सादर केला जाणार आहे. तसेच मंडपालगतच्या पदपथावरील कचरा साफ करून तेथे शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबा शेड व वृत्तपत्र वाचनालय उभे करण्यात येणार आहे.
>विविध स्पर्धांचे आयोजन
शालेय विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे निबंध, चित्रकला, स्मरणशक्ती, वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. तसेच महिलांमध्ये स्पर्धेदरम्यान पैठणी मिळविण्यासाठी चांगलीच चुरस रंगते.
>विद्यार्थ्यांचा गुणगौरव
विभागातील शालेय व महाविद्यालयांतील विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. तसेच दहावी आणि बारावीतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
>लेजीमच्या तालावर बाप्पाचे आगमन
विभागातील तरुणतरुणींनी सज्ज लेजीम पथकाच्या तालावर बाप्पाचे आगमन होते. सदरा-लेंगा व नऊवारी साड्या या पारंपरिक वेशात नटूनथटून विभागातील नागरिक आगमन सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.