भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 09:22 AM2020-12-21T09:22:41+5:302020-12-21T09:25:18+5:30

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन

social distancing rules not followed at bjp mla ram satpute wedding | भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

भाजप आमदाराच्या लग्नात सर्व नियम धाब्यावर; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, बडे नेते विनामास्क

Next

पुणे: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरीही धोका कायम आहे. तरीही अनेक जण बेजबाबदारपणे वागत आहेत. स्वत:ला जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधीदेखील यात मागे नाहीत. याचा प्रत्यय भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या लग्न सोहळ्यात आला. या समारंभात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला. लग्नाला उपस्थित असलेल्या अनेक मोठ्या नेत्यांनी मास्कदेखील घातले नसल्याचं फोटोत दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना 'दो गज की दुरी' राखण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन करत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी मास्कशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता राज्यातले भाजप नेते लग्न समारंभात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करताना दिसले. पुण्यात संपन्न झालेल्या राम सातपुतेंच्या सोहळ्याला ५०० हून अधिक जणांची उपस्थिती होती. यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता.



सातपुतेंच्या विवाह सोहळ्याला पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. या नेतेमंडळींसह लग्नाला हजर असलेल्या इतरांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कदेखील दिसत नव्हते. त्यामुळे आता या प्रकरणी कोणती कारवाई केली जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.



सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो उपस्थितांनी शेअर केले. यावेळी राम सातपुतेंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मात्र अनेकांनी लग्नातील गर्दी पाहून नाराजीही व्यक्त केली. सर्वसामान्यांसाठी लग्नाला केवळ ५० पाहुण्यांना बोलावण्याची मुभा असताना लोकप्रतिनिधींनी लग्नाला शेकडोच्या संख्येने गर्दी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. नेते मंडळी नियम सर्रास धाब्यावर बसवतात. मग नियम केवळ सर्वसामान्यांसाठीत आहेत का, असा सवालदेखील या सोहळ्यानंतर विचारला जात आहे.

Web Title: social distancing rules not followed at bjp mla ram satpute wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.