‘सेनानु गुजराती’ चे सोशल इंजिनियरिंग

By admin | Published: February 1, 2017 05:54 AM2017-02-01T05:54:52+5:302017-02-01T05:54:52+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचेही गुजराती समाजातील नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या

Social Engineering of 'Senanu Gujarati' | ‘सेनानु गुजराती’ चे सोशल इंजिनियरिंग

‘सेनानु गुजराती’ चे सोशल इंजिनियरिंग

Next

- यदु जोशी,  मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचेही गुजराती समाजातील नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली असून बव्हंशी भाजपाकडे असलेला हा मतदार आपल्याकडे वळविण्याचा मातोश्रीचा प्रयत्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षे प्रदेश पदाधिकारी राहिलेले आणि त्यांच्या गुजराती सेलचे अध्यक्ष हेमराज शहा सर्वात आधी शिवसेनेत डेरेदाखल झाले. त्यानंतर काँग्रेसच्या गुजराती सेलचे अध्यक्ष भरत धनानी यांनीही भगवा हाती घेतला. त्या पाठोपाठ भाजपाच्या गुजराती सेलचे अध्यक्ष मंगल भानुशाली यांनी शिवसेनेची वाट धरल्याने शिवसेना-गुजराती या सोशल इंजिनियरिंगची चर्चा सध्या जोरात आहे.
मुंबईत मराठी मतांची कमी होत असलेल्या टक्केवारीने शिवसेनेला गुजराती टेकूची गरज भासू लागली आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी भाषकांपेक्षा गुजराती समाजाला जवळ करण्याचे धोरण म्हणूनच स्वीकारण्यात आल्याचे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजराती असताना या समाजाचे स्थानिक नेते आणि मते आपल्याकडे वळविण्याचे अवघड काम शिवसेनेने हाती घेतले आहे.
‘बजाव पुंगी, भगाव लुंगी’ असा नारा शिवसेनेने एकेकाळी दाक्षिणात्यांविरुद्ध दिला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र रचणारे म्हणून मोरारजी देसार्इंपासून अनेक गुजराती नेत्यांना शिवसेनेने लक्ष्य बनविले. मात्र, आज मराठी वडापावने गुजराती ढोकळ्याशी दोस्तीचा हात पुढे केला आहे.

- मराठी माणसांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या शिवसेनेने राम जेठमलानी, राजकुमार धूत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, प्रीतीश नंदी, संजय निरुपम या अमराठी व्यक्तींना राज्यसभेवर पाठविले.
त्यावेळच्या जनता परिवारातील बडे नेते शांती पटेल आणि काँग्रेसचे दिग्गज नेते रजनी पटेल हे दोघेही गुजराती. त्यांना लक्ष्य करीत शिवसेनेने, ‘यांचे शांती पटेल, त्यांचे रजनी पटेल, हे मराठी मनाला कसे पटेल?’ असा सवाल शिवसेनेने केला होता.
एकेकाळी मुंबईतील गुजराती समाज मराठी माणसांना ‘मुंबई तुमची तर भांडी घासा आमची’ असे हिणवायचा म्हणतात. त्याचे भरपूर भांडवल शिवसेनेने आणि गुजराती उमेदवाराच्या विरोधात इतरही पक्ष करीत असत.
बोरीवली, कांदीवली, मालाड, गोरेगाव, दहीसर, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, ग्रँटरोड, चर्नीरोड, कुलाबा, घाटकोपर, मुुलुंड, माटुंगा, वडाळा या भागांमध्ये गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास १८ ते २० लाख गुजराती मतदार मुंबईत असून ५० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये तो निर्णायक ठरू शकतो.

गुजराती समाजाला मुंबईचा विकास करणारा पक्ष हवा आहे. हा समाज भाजपाच्या पाठीशी त्यासाठीच उभा असल्याचे निवडणुकीच्या निकालातदेखील दिसेल. चारदोन नेते शिवसेनेत गेले असले तरी गुजराती समाज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या सोबतच आहे.
- योगेश सागर, भाजपाचे आमदार

गुजराती समाजाने आतापर्यंत भाजपाला साथ दिली पण या समाजासाठी भाजपाने काहीही केले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही अवहेलनाच झाली. या सरकारच्या नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. भाजपाने गुजराती समाजाची निराशा केली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे.
- हेमराज शहा, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले नेते.

Web Title: Social Engineering of 'Senanu Gujarati'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.