प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात ‘सोशल’ लढा
By admin | Published: March 7, 2017 02:09 AM2017-03-07T02:09:26+5:302017-03-07T02:09:26+5:30
प्रसिध्दी माध्यमांबरोबरच प्रचार, प्रसाराचे उत्तम साधन म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर होऊ लागला
वैभव गायकर,
पनवेल- प्रसिध्दी माध्यमांबरोबरच प्रचार, प्रसाराचे उत्तम साधन म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. या माध्यमाचा योग्यरीत्या, नियोजनपूर्वक वापर केल्यास समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळतोच, हे प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला सोशल मीडियावर मिळणाऱ्या पाठिंब्यावरून मान्य करावे लागेल.
आपल्या न्याय हक्कांसाठी अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा सिडकोबरोबरच लढा सुरू आहे. सिडकोने ठाणे, रायगड या दोन जिल्ह्यातील सुमारे ९५ गावांच्या जमिनी संपादित केल्या व नवी मुंबई शहर वसविले. मात्र दिलेली आश्वासने पाळली नसल्याने प्रकल्पग्रस्तांकडून लहान-मोठी शेकडो आंदोलने, मोर्चे, निदर्शने करण्यात आली. तरीही आजतागायत त्यांचे प्रश्न सुटलेले नाही. आता प्रकल्पग्रस्तांची चौथी पिढी आंदोलनात उतरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा तरुण सिडकोविरोधात एकवटला आहे.
प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणाऱ्या आगरी कोळी युथ फाउंडेशनने छेडलेल्या लढ्याला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे. १४ मार्च रोजी सिडकोविरोधात एल्गार पुकारला आहे. मी भूमिपुत्र... माझा हक्क... माझा लढा... ही चळवळ गावोगावी उभी करून ती प्रकल्पग्रस्तांपर्यंत पोहोचल्याने हजारो तरुण यात सहभागी होत आहे.
फाउंडेशनने उपोषणात पाच मागण्या सिडकोसमोर ठेवल्या आहेत. त्यात गावठाण व विस्तारित गावठाणातील जमिनीचा सनद स्वरूपात अधिकार, गावठाण व गावठाणातील घरांना संरक्षण व नियमितीकरण, प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या उद्योग-व्यवसाय, शाळा प्रवेशामध्ये आरक्षण आणि विद्यावेतनाचा अधिकार, प्रकल्पग्रस्तांचे राखून ठेवलेले ३.७५ टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत करण्यात यावेत, एमआयडीसी क्षेत्रातील संपादित जमिनीच्या बदल्यात १५ टक्के भूखंड वाटप करावेत आदी मागण्यांचा समावेश आहे.
>मराठा समाजाचाही पाठिंबा
आगरी कोळी युथ फाउंडेशनने प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला आहे. ४५ वर्षांपासून सिडको व शासनाबरोबर भूमिपुत्र लढा देत असून शासन फक्त आश्वासनांवर बोळवण करत आहे. यामुळे आता निकराचा लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. १४ मार्चपासून सीबीडीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असून या लढ्याला प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर समाजाचा व संघटनांचाही पाठिंबा वाढत आहे. नवी मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी भूमिपुत्रांनी जाहीर पाठिंबा दिला होता. यामुळे आता मराठा समाजाने पत्रक काढून प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून सोशल मीडियामधून आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठीची जनजागृती सुरू केली आहे.
>प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यात नवी मुंबईमधील २८ गावांचा समावेश कमी प्रमाणात होता. लढ्याबाबत गावांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेण्यात आल्या. आमरण उपोषणाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. नवी मुंबईमधील उच्चशिक्षित मंडळींपर्यंत हा लढा पोहचला पाहिजे.
- नीलेश पाटील,
आगरी कोळी युथ फाउंडेशन
>प्रकल्पग्रस्तांचा लढा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचला आहे. जरी २८ गावांत या लढ्याची जनजागृती केली गेली असली तरी या लढ्याच्या मागण्या संपूर्ण ९५ गावांना लाभदायक आहेत. म्हणून आम्ही देखील लढ्यात उतरणार आहोत.
- समाधान खोपरकर,
प्रकल्पग्रस्त तरुण,
दापोली, पनवेल.