व्हिसासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांची धावपळ
By admin | Published: April 23, 2015 05:18 AM2015-04-23T05:18:32+5:302015-04-23T05:18:32+5:30
लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाच्या खरेदीकरिता गुरुवारी दुपारी लंडनकडे रवाना होणारे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची
मुंबई : लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाच्या खरेदीकरिता गुरुवारी दुपारी लंडनकडे रवाना होणारे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची बुधवारी व्हिसा मिळवण्याकरिता धावपळ सुरू होती. बडोले यांचा विदेश दौरा पूर्वनियोजित असताना त्यांना व्हिसा मिळण्याकरिता अखेरच्या क्षणापर्यंत धडपड का करावी लागली, असा सवाल केला जात आहे.
लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या लंडन दौऱ्यात केली होती. याकरिता ४५ लाख रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली. सामाजिक न्यायमंत्री बडोले हे या खरेदी व्यवहाराकरिता रवाना होतील, असेही सरकारने आठ-दहा दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यांच्या दौऱ्याकरिता सुमारे १५ लाख रुपयांची तरतूद केली. बडोले यांनी आपल्या लंडन भेटीची माहिती देण्याकरिता बुधवारी पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र व्हिसा न आल्याने बडोले यांची व त्यांच्या कार्यालयाची धावपळ सुरु असल्याने पत्रकार परिषद रद्द केल्याचे समजते. याबाबत बडोले यांच्या खासगी सचिवांना विचारले असता त्यांच्या पत्रकार परिषदेचा निरोप आमच्याकडून दिला गेला नाही, असे त्यांनी सांगितले.
मात्र त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बडोले यांनी गुरुवारी दुपारी व्हिसाकरिता बोटांचे ठसे देणे व अन्य प्रक्रिया पार पाडली. हा शासकीय दौरा असतानाही त्याकरिता लागणाऱ्या मान्यता मंगळवारी रात्री दिल्लीवरून प्राप्त झाल्या. त्यामुळे दौऱ्याची तयारी करायची की व्हिसाकरिता खेटे मारायचे, अशा कात्रीत बडोले सापडल्याचे समजते. याबाबत बडोले यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)