सोशल मीडिया हा समविचारी लोकांमधील संपर्कसेतू

By admin | Published: November 25, 2015 03:54 AM2015-11-25T03:54:35+5:302015-11-25T03:54:35+5:30

सोशल मीडियाच्या साधनांनी धार्मिक कट्टरवाद पसरविण्यास, त्यासाठी लोकांची भरती करण्यास आणि दूरवरच्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या समविचारी लोकांमध्ये संपर्कसेतू निर्माण करण्यास सुलभता होत आहे

Social media is a contact between people of the community | सोशल मीडिया हा समविचारी लोकांमधील संपर्कसेतू

सोशल मीडिया हा समविचारी लोकांमधील संपर्कसेतू

Next

मुंबई : सोशल मीडियाच्या साधनांनी धार्मिक कट्टरवाद पसरविण्यास, त्यासाठी लोकांची भरती करण्यास आणि दूरवरच्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या समविचारी लोकांमध्ये संपर्कसेतू निर्माण करण्यास सुलभता होत आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूर रिचर्ड वर्मा यांनी येथे व्यक्त केले.
इंडिया फाउंडेशन, अमेरिकेचा मुंबईतील वाणिज्य दूतावास आणि अटलांटिक कौन्सिलने येथे आयोजित केलेल्या महानगरांच्या सुरक्षेवरील परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसांची ही परिषद मंगळवारी संपली.
वर्मा म्हणाले की, लोकांच्या छोट्या समूहांना आणि अगदी व्यक्तींनाही प्राणघातक शस्त्रे व लष्करी दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होते ज्यामुळे ते शहरांच्या कामकाजावर आघात करू शकतात. रहिवाशांच्या नित्याची गरज म्हणून महानगरांमध्ये दळणवळण आणि वाहतुकीची कार्यक्षम व्यवस्था असतेच. त्याचाच वापर करून या दहशतवादी शक्ती कोणालाही सुगावा लागू न देता आपल्या कामासाठी लोकांची भरती करणे आणि त्यांची साखळी तयार करण्याचे काम तुलनेने सुलभपणे करू शकतात.
समाजात विविध कारणांनी आधीपासून असलेल्या असंतोषामुळे या शक्तींना सुपीक पार्श्वभूमी मिळते, असे सांगून अमेरिकी राजदूतांनी असे सावध केले की, महानगरे जसजशी आणखी वाढत जातील तसतसा नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत सरकारांवर वाढता दबाव देत जाईल व याची पूर्तता झाली नाही, तर असंतोष वाढण्याची शक्यता आहे.
याच परिषदेत बोलताना राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) चंद्रा अय्यंगार यांनी मुंबईत २००८मध्ये झालेल्या हल्ल्यांसाठी (२६/११) गुप्तचर व्यवस्थेचे अपयश हे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले व दहशतवादाला जागतिक पातळीवर होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याला रोखले गेले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
‘महानगरांच्या सुरक्षेसंदर्भात प्रसारमाध्यमांची भूमिका’ या सत्रात मान्यवर पत्रकारांनी संघर्ष आणि दहशतवादी घटनांचे वार्तांकन कसे करायचे याचे प्रशिक्षण पत्रकारांना दिले गेले पाहिजे, असे म्हटले.
विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे वरिष्ठ सदस्य व माजी पत्रकार नितीन गोखले म्हणाले की, ‘‘दहशतवादी हल्ल्यांसारख्या घटनांमध्ये संदेश हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि तेही विश्वसनीय व त्वरित आले पाहिजेत.’’
इंडियन एक्स्प्रेसचे सुशांत सिंह यांनी सरकारने अगदी नियोजनाच्या पायरीपासून प्रसारमाध्यमांना सहभागी करून घेतले पाहिजे. प्रमाण कारवाई पद्धती कार्यरत असली पाहिजे आणि अनेक घटकांना हवी असलेली माहिती वा संदेश देण्याचे एकच केंद्र असले पाहिजे, असे सांगितले. दंगली, युद्ध आणि दहशतवादी हल्ल्यांचे वार्तांकन हे विशेष क्षेत्रांचे काम समजले पाहिजे व अशा घटनांची जबाबदारी जो कोणी उपलब्ध असेल अशा पत्रकाराकडे दिली जायला नको. अशा घटनांच्या वार्तांकनासाठी संस्थेने पत्रकारांना प्रशिक्षण द्यायला हवे, असेही सुशांत सिंह यांनी सांगितले.
‘द हिंदू’ वृत्तपत्राच्या रणनीतिक व राजकीय व्यवहारांच्या संपादक सुहासिनी हैदर यांनी रासायनिक व जैविक युद्धांचे वार्तांकन कसे करावे यासाठी प्रसारमाध्यमांनी तयार असले पाहिजे, असे म्हटले. (विशेष प्रतिनिधी)
शर्मा यांच्याच प्रश्नाला उत्तर देताना सुशांत सिंह म्हणाले की, ‘आमच्या हातात जर भारताच्या अण्वस्त्रांची गुपिते असतील, तर त्यांना जाहीर न करणे आम्ही देशाच्या हिताचे समजले पाहिजे, एवढी संवेदनशीलता आमच्यामध्ये आहे. कंदहार विमान अपहरण प्रकरणाची सोडवणूक करण्यात ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे माहिती असूनही प्रसारमाध्यमांनी त्याचा वार्तांकनात उल्लेख येऊ दिला नव्हता.’ अधिकाऱ्यांनी माहितीसह पुढे आले पाहिजे, म्हणजे त्यातून काल्पनिक गोष्टींच्या वार्तांकनाऐवजी वस्तुस्थिती समोर येईल, असे सुशांत सिंह म्हणाले.

Web Title: Social media is a contact between people of the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.