सोशल मीडियाला ना आई ना बाप - राज ठाकरे
By Admin | Published: May 6, 2016 05:25 PM2016-05-06T17:25:10+5:302016-05-06T18:29:50+5:30
मला सोशल मीडियावर राहायला व त्या माध्यमातून प्रचारतंत्र राबवायला आवडत नाही, त्याला ना आई ना बाप असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
>मला सोशल मीडियावर राहायला व त्या माध्यमातून प्रचारतंत्र राबवायला आवडत नाही, त्याला ना आई ना बाप असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. मी स्वत: फेसबुक, ट्विटर वा व्हॉट्स अॅपवर नाही असंही ते म्हणाले.
लोकमतच्या संपादकीय टीमसी चर्चा करताना ते म्हणाले की, कुणाही ऐऱ्यागैऱ्याच्या हातात ते यंत्र असतं, कोणीही उठतो व काहीही बोलत असतो. त्याला किती महत्त्व देणार. काही लोक फेसबुकवर लेख लिहितात व नंतर त्याला किती लाइक मिळाले हे पाहात बसतात. काहीवेळा लाइक्समधून लायकीपण कळते, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. सोशल मीडियाकडे पाहून काय लिहायचे, कसे व्यक्त व्हायचे हे ठरवू नये. तुम्हाला जे वाटते ते लिहा. प्रतिक्रियांची चिंता करत बसू नका, असे राज म्हणाले.
नवसंघीष्ट आले उदयाला
सध्या सत्ताधाऱ्यांच्या प्रेमात बुडालेल्यांची एक नवीन टोळी उदयास आली आहे. त्यांना मी ‘नवसंघीष्ट’ असे नाव दिले आहे. ही टोळी सोशल मीडियावर कार्यरत आहे. कोणी मोदी सरकारवर टीका केली की, ही टोळी त्यांच्यावर तुटून पडते. शिवाय, भाजपाचा सोशल मीडिया सेल चांगलाच कार्यरत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर केवळ भाजपा कार्यरत होते, पण आता विरोधकांनीही हे तंत्र अवलंबल्याने सोशल मीडियावरील मोदी समर्थकांच्या मक्तेदारीला आव्हान मिळाले आहे. त्यामुळे आता मोदीविरोधी प्रचारही सोशल मीडियावरून सुरू झाला आहे.
उठसूठ टिवटिव मला पसंत नाही
माझ्यापुरताही मी हाच निर्णय घेतला आहे. मला जेव्हा बोलावेसे वाटेल, तेव्हाच मी बोलणार, उगाच ऊठसूठ टिवटिव करणे मला पसंत नाही. अर्थात, सोशल मीडियावरील प्रचारतंत्र सध्या वापरत नसलो, तरी या तंत्राचा प्रभावी वापर मला २००८ मध्ये अटक झाला, तेव्हा मनसेने तो प्रथम केला होता. भाषणांची क्लिप सर्वत्र मोबाइलवर फिरली. वातावरण निर्मिती झाली. त्या वेळी सगळ्यांना या माध्यमाची ताकद कळली व २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी या माध्यमाचा खुबीने वापर केला.
मोदींच्या विजयात सोशल मीडियाचा नाही राहूल गांधींचा वाटा मोठा
नरेंद्र मोदी यांच्या २०१४ मधील विजयात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, हा समज चुकीचा आहे. खरे तर राहुल गांधी यांचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता. प्रतिस्पर्धी म्हणून मोदींच्या तुलनेत राहुल गांधी कोठेच नव्हते. राहुल यांच्या उमेदवारीमुळे मोदींचे काम सोपे झाले. आता मोदींबाबत मी भूमिका बदलतो असे म्हणतात, पण चांगल्या गोष्टीला चांगले म्हणणे आणि वाईट घडले की वाईट म्हणणे हे स्वाभाविकच ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत माझी नेमकी हीच भूमिका आहे.