सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट !
By Admin | Published: February 29, 2016 04:32 AM2016-02-29T04:32:28+5:302016-02-29T04:32:28+5:30
आमच्या अंगावर खाकी आहे, हा आमचा गुन्हा आहे का? ‘आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.
पुणे : ‘आमच्या अंगावर खाकी आहे, हा आमचा गुन्हा आहे का? ‘आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.’ ‘आम्हाला संघटीतत होता येत नाही,अन्यायाविरुद्ध दाद मागता येत नाही, पगारवाढीसाठी संपावर जाता येत नाही.’ ‘अरे किती कराल शोषण आमचं’, अशा व्यथा मांडणारे मेसेज सध्या सोशल मीडियावरून फिरत आहेत.
खादी वर्दीवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्विग्न झालेल्या पोलिसांनी व्हॉट्स अॅप ग्रुप आणि सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट मोकळी करुन दिली आहे. ‘आम्ही सर्व पोलीस एक आहोत’ अशी ‘इमेज’ व्हॉट्स अॅप ग्रुपचा डीपी ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना जेवढे कमकुवत कराल तेवढीच गुंडगिरी फोफावेल. पोलिसांवर सर्रास उचलले जाणारे हात ही भविष्यातील धोक्यातील घंटा आहे. आज लोकांना पोलिसांवर हात उचलून छान वाटत असेल, मात्र जेव्हा त्यांची मानसिक शक्ती संपेल आणि तो कमकुवत, लाचार होईल तेव्हा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. व्यवस्था आणि लोकांची अनास्था यामुळे अर्धमेल्या झालेल्या पोलिसांकडून त्यावेळी मदतीची अपेक्षा करण्यात अर्थ उरणार नाही, अशी भूमिका पोलीस कर्मचारी मांडत आहेत.
गुन्हेगारावर कारवाई करताना पुढाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फोन सुरू होतात. त्यांना न जुमानता कारवाई केली तर बदलीची भीती घातली जाते. दुर्दैव म्हणजे अशा कारवायांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेकदा बदल्या झाल्याचीही उदाहरणे आहेत. राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना प्रवेश देतात. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात. मग पोलिसांचा दरारा कसा राहील? राजकीय झालर पांघरलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांना रोखण्याची पोलिसांना खरोखरीच मोकळीक असते का? किंबहुना ती दिली जाते का, याचा कोणी विचार करत नाही, असा सवालही एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.
एका आमदाराने तलाठ्याला मारहाण केली तर राज्यातील सर्व तलाठी संपावर जाण्याच्या तयारीला लागले होते. संबंधित आमदारावर तातडीने कारवाई झाली. पोलिसांना संपाचा आणि संघटीत होण्याचा अधिकार नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उघड निषेध नोंदवता येत नसल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)बीडमधील राहुल दुबाले तरुणाने पुढाकार घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापना केली. त्याचे वडील आणि दोघेही भाऊ पोलीस खात्यात कार्यरत आहेत. ‘बस झाली आता सहनशीलता, बस झाले आता खाकीवर हल्ले, आता पेटून उठाच..’ असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून महाराष्ट्रातील ‘पोलीसपुत्रां’ना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. समाजाचे रक्षण करतात त्यांचे संरक्षण कोण करणार? महिलांचा आदर कोण करणार? हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्रातील ‘पोलीसपुत्र’ सोमवारी मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती दुबाले याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. शासनाने अशा हल्लेखोरांवर जरब बसविण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांमध्यो पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. लातूरच्या पानगावमध्ये पोलिसांना झालेली मारहाणीची घटना ताजी असताना, ठाण्यातही महिला वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण झाली. त्यात कांदिवलीमध्येही दोन पोलिसांना बेदम मारहाण झाल्याची घटना ताजी आहे. शासनाने अजूनही मौन बाळगल्याने आणखी किती असा अन्याय सहन करायचा? असा प्रश्न पोलीस कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच बीडमधील राहुल दुबाले तरुणाने पुढाकार घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापना केली असून पोलिसांवरील प्रश्नांसाठी मंत्रालयात जाऊन प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.