सोशल मीडियामुळे मुलाचा चार तासांत शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 12:35 AM2016-06-02T00:35:10+5:302016-06-02T00:35:10+5:30
आईला वाटले वडिलांनी घरी नेले, तर वडिलांना वाटले आईबरोबर आहे, या गैरसमजातून चार तास आपल्या पालकांपासून ताटातूट झालेला मुलगा सोशल मीडियामुळे भेटला. ही घटना नारायणगाव येथे घडली.
नारायणगाव : आईला वाटले वडिलांनी घरी नेले, तर वडिलांना वाटले आईबरोबर आहे, या गैरसमजातून चार तास आपल्या पालकांपासून ताटातूट झालेला मुलगा सोशल मीडियामुळे भेटला. ही घटना नारायणगाव येथे घडली.
याबाबत माहिती अशी, हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील अतिश पांडुरंग शिंदे (वय ३०) व त्यांची पत्नी भावना (वय २५) हे दुपारी १२ वाजता आपला मुलगा संग्राम (वय ३) यांच्यासह नारायणगाव येथे कामानिमित्त आले होते. काम उरकल्यानंतर मोबाइल फोनच्या नादात अतिश शिंदे मोटारसायकल घेऊन पुन्हा गावी हिवरे येथे परतले. त्याच वेळी मुलगा संग्राम हा थोडा बाजूला गेला व त्याच्या आईला वाटले की, संग्रामला त्याच्या वडिलांनी घरी नेले. मात्र प्रत्यक्ष संग्राम तेथेच रडत राहिला. संग्रामला रडताना पाहून फळविक्रेते गजानन कोंडाजी दरेकर व सुरेश रामचंद्र बनकर यांनी त्याच्याजवळ विचारपूस केली; मात्र तो रडायचा थांबेना. हे पाहून महेंद्र खेबडे, चेतन पडघम व किरण वाजगे यांनी या बालकाची माहिती सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना दिली. त्यानुसार मुजावर यांनी ट्रॅफिक आॅर्डन गणेश बेल्हेकर यांना संबंधित बालकाला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत बाळाचे फोटो वाजगे, खेबडे यांनी व्हॉट्सअॅपवरून व्हायरल केले.
या दरम्यान नारायणगाव बसस्थानकात हेमंत वारूळे यांनी बालकाविषयी बसस्थानकातील ध्वनिक्षेपकाद्वारे(माईकद्वारे) माहिती जाहीर केली. दुपारी चारच्या दरम्यान व्हॉट्सअॅपवरील माहिती व फोटोद्वारे मुलाच्या वडिलांना मुलगा हरविल्याचे समजले. मेसेजमधील संपर्क क्रमांकानुसार अतीश शिंदे यांनी गणेश बेल्हेकर, महेश गाढवे व ठाणे अंमलदार आबा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. अखेर चार तासांनंतर ताटातूट झालेल्या संग्रामची आईवडिलांशी भेट झाली. (वार्ताहर)