रितेश देशमुख, रवी जाधव यांचं रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन; शिवभक्त संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 11:29 AM2018-07-06T11:29:22+5:302018-07-06T11:32:55+5:30

सोशल मीडियावर शिवभक्तांनी व्यक्त केला संताप

social media outrage over photo session by ravi jadhav ritesh deshmukh vishwas patil near Shivaji Maharaj statue at raigad | रितेश देशमुख, रवी जाधव यांचं रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन; शिवभक्त संतापले

रितेश देशमुख, रवी जाधव यांचं रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन; शिवभक्त संतापले

रायगड: अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पानीपतकार विश्वास पाटील यांनी थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं सामान्य शिवभक्त संतापले आहेत. सामान्य शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणास्तव सिंहासनाजवळ जाऊ दिलं जात नाही. मग रितेश देशमुख, रवी जाधव सिंहासनावर जाऊन फोटोशूट कसं करतात, असा प्रश्न शिवभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेचा निषेध करणारे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. 

गेल्या वर्षी रायगडावरील सिंहासनावर आरुढ असलेल्या शिवरायांच्या हातातील तलवार तुटलेल्या स्थितीत आढळून आली होती. तेव्हापासून मेघडंबरीकडे जाणाऱ्या पायाऱ्यांजवळच बॅरेकेड्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य शिवभक्त पायऱ्यांजवळूनच शिवरायांना वंदन करतात. राज्याभिषेक सोहळ्यादिवशी शिवभक्तांना चौथऱ्यावर जाण्याची परवानगी असते. त्याहीवेळी कोणालाही मेघडंबरीत जाता येत नाही. शिवभक्त स्वत:हून ही मर्यादा पाळतात. मात्र अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव थेट मेघडंबरीत गेल्यानं शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. 

श्री शिवराजाभिषेक सोहळा ज्या ठिकाणी पार पडला, ते ठिकाण अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी जाताना काही गोष्टींचं भान राखणं गरजेचं असतं. मात्र रवी जाधव आणि रितेश देशमुख यांनी ते पाळलं नाही, असं श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे (दुर्गराज रायगड) कार्याध्यक्ष सनी ताठेले यांनी 'लोकमत'शी बोलताना म्हटलं. 'महाराजांना मुजरा करताना काही शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. सामान्य शिवभक्त मुजरा करताना दहा हात लांब राहतात,' असं ताठेले म्हणाले. 

सनी ताठेले यांनी रायगडावरील सुरक्षेबद्दलदेखील प्रश्न उपस्थित केले. 'राज्याभिषेकाव्यतिरिक्त इतर सर्व दिवशी शिवभक्त साधारणत: 15 मीटर लांब राहून महाराजांना अभिवादन करतात. मेघडंबरीकडे जाणाऱ्या पायऱ्यांजवळच बॅरिकेड्स लावलेल्या असतात. याशिवाय तिकडे सुरक्षारक्षकही तैनात असतात. रवी जाधव, रितेश देशमुख मेघडंबरीत गेले, तेव्हा सुरक्षा रक्षक कुठे होते?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'एकवेळ रवी जाधव, रितेश देशमुख यांना प्रोटोकॉल माहित नसतील. पण त्यांच्यासोबत असलेल्या पानीपतकार विश्वास पाटील यांना मेघडंबरीचं पावित्र्य आणि तिथल्या शिष्टचारांची कल्पना नाही का?' असाही प्रश्न त्यांनी विचारला. 
 

Web Title: social media outrage over photo session by ravi jadhav ritesh deshmukh vishwas patil near Shivaji Maharaj statue at raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.