सोशल मीडियाही ‘कलरफुल्ल’
By Admin | Published: March 25, 2016 01:13 AM2016-03-25T01:13:23+5:302016-03-25T01:13:23+5:30
दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सप्तरंगांची उधळण सुरू झाली होती. याचाच प्रत्यय गुरुवारी धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या जोरदार सेलीब्रेशनमध्येही दिसून आला.
मुंबई : दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सप्तरंगांची उधळण सुरू झाली होती. याचाच प्रत्यय गुरुवारी धूलिवंदनाच्या दिवशी झालेल्या जोरदार सेलीब्रेशनमध्येही दिसून आला. पाण्याचा अपव्यय टाळत, सुक्या रंगांची होळी खेळत मुंबईकरांनी धुळवड साजरी केली.
मुंबईकरांनी जोशपूर्ण वातावरणात मात्र सामाजिक भान जपत रंगपंचमी साजरी केल्याचे दिसून आले. शिवाय, या हटके सेलीब्रेशनचे फोटोस् आणि स्टेट्स लगेचच फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्स अॅप आणि टिष्ट्वटरवर दिसून आले. बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेला रंगपंचमीचा जल्लोष गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत दिसून आला. शिवाय, दुपारनंतर
सर्वांचेच व्हॉट्स अॅप डीपी विविध रंगांमध्ये न्हाऊन गेलेले दिसून आले.
मुंबईतील विविध महाविद्यालयांच्या तरुणाईने गुरुवारी निवासी वसाहतींमध्ये जाऊन पाणी न वापरता रंगपंचमी साजरी करण्याविषयी जनजागृती केली. तर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बालगृहाला भेट देत तेथील चिमुरड्यांसोबत रंगपंचमी साजरी करत त्यांचा आनंद द्विगुणित केला. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदिवासी पाड्यांना भेट देऊन त्यांच्यासोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. तर काही मंडळांनी पुरणपोळीचा नैवेद्य रस्त्यांवरील वंचित व्यक्तींना दान करीत अनोखी होळी साजरी केली. यात मुंबईतील अनेक स्वंयसेवी संस्थांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)