सामाजिक प्रतिष्ठेच्या हुंड्याचे चढते रेटकार्ड
By admin | Published: February 26, 2016 07:48 AM2016-02-26T07:48:13+5:302016-02-26T07:49:50+5:30
हुंड्यातली जुलूम जबरदस्ती कमी होत आता तो ‘स्वेच्छेने’ देण्याघेण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २५ - बोहल्यावर चढू पाहणाऱ्या आजच्या तरुण मुलांच्या बाशिंगबळात आजही ‘हुंडा’ महत्वाचा आहे. हुंड्यातली जुलूम जबरदस्ती कमी होत आता तो ‘स्वेच्छेने’ देण्याघेण्याचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे.
हुंडाबंदी कायद्याने हुंडा देणेघेणे बंद तर झाले नाहीच उलट बदलत्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत, आणि सेलिब्रेशनच्या रेट्यात आता ‘हुंडा’ रंगरूप बदलत राजीखुशीचा मामला बनतो आहे, त्यात ना कुणाला कसला अपराध वाटतोय, ना कसला अपराध गंड!
हे ‘मत’ आहे महाराष्ट्रभरातल्या, विशेषत: खेड्यापाड्यात आणि निमशहरी भागात राहणाऱ्या लग्नाच्या वयातल्या मुलामुलींचं.
‘लोकमत ऑक्सिजन’ पुरवणीच्या वतीने घेण्यात आलेल्या वाचक चर्चेत तीन हजाराहून अधिक पत्रं आणि सातशेहून अधिक इमेल्स पाठवत सहभागी झालेल्या तरुण मुलामुलींनी हुंड्याची नवीन परिभाषाच मांडली आहे. आणि त्यांच्या मते, जर देणारा देतो, घेणारा घेतो, तर यात गुन्हा कुठे आणि कसला होतो? ‘हुंडा’ द्यावा लागतो, त्यापायी लग्न मोडतं, सासरी छळ होतो या कहाण्या तर मुलींच्या वाट्याला आजही नित्याच्या आहेत.
मात्र आधुनिक, सुसंस्कृत, आणि स्वतंत्र म्हणवणाऱ्या तरुण मुलांवर अशी काय सक्ती असते की, लग्नात त्यांना हुंडा घ्यावाच लागतो? कुठल्या प्रकारचं सामाजिक, मानसिक प्रेशर किंवा पालकांची सक्ती असते म्हणून ते हुंड्याला नाही म्हणू शकत नाहीत? असे प्रश्न ‘ऑक्सिजन’ने राज्यभरातल्या तरुण मुलग्यांसमोर मांडले होते. त्याला उत्तर म्हणून आलेल्या पत्रांच्या ढिगात जी उत्तरं सापडली ती चक्रावून टाकणारी आहेत.
हे तरुण मुलगे सांगतात की, हुंडा घ्यायलाच हवा अशी पालकांची सक्ती असतेच, पण हुंड्याला नकार दिला तर मुलींचे पालक मुलातच दोष शोधतात, बदनामी करतात आणि लग्न जमणं मुश्किल होते. दुसरीकडे उच्चशिक्षित आणि शहरी नोकरीवाल्या मुलांशीच आपल्या मुलीचे लग्न व्हावे, खेड्यापाड्यातला जावई नको म्हणत पालकही अशा स्थळांचा शोध काही लाखांची तजबीज करुनच घेतात आणि त्यामुळे राज्यभरात उच्चशिक्षित सरकारी-खाजगी लग्नाळू मुलांच्या हुंड्याचं रेटकार्डच तयार झालेले आहे असेही ही पत्रे सांगतात.
म्हणूनच काही लाखांच्या रोख रकमेसह थाटामाटात लग्न, मुलीला संपूर्ण संसार भेट देणं, दागिने, ते थेट देशविदेशातलं हनिमून पॅकेज गिफ्ट करणं इतपर्यंत टोलेजंग लग्न दुष्काळाच्या सावटातही साजरी होत आहेत. ‘ऐपत’ असलेले मुलींचे वडील ‘हौशीने’ आणि ‘स्वत:हून’ हुंड्याच्या थैल्या सोडत मनासारखा जावई निवडत आहेत.
‘हुंडा’ असं लेबल न लागता लग्नाची ही देणीघेणी नेमकी का आणि कशामुळे होतात? ती कुणाला फायदेशीर आणि सोयीची वाटतात? तरुण मुलामुलींच्याही हे सारे का पथ्यावर पडते आहे याचे विस्तृत विश्लेषण वाचा, आजच्या ‘आक्सिजन’ पुरवणीत..