बालनाट्यांतून समाजप्रबोधन!
By Admin | Published: February 20, 2016 01:41 AM2016-02-20T01:41:18+5:302016-02-20T01:41:18+5:30
नाट्यसंमेलनांंतर्गत गडकरी रंगायतन येथील श्याम फडके रंगमंचावर सादर करण्यात आलेल्या राजू तुलालवार यांच्या फुग्यातला राक्षस, प्रवीण भारदे यांच्या हॅप्पी बर्थ डे व राजेश राणे
नाट्यसंमेलनांंतर्गत गडकरी रंगायतन येथील श्याम फडके रंगमंचावर सादर करण्यात आलेल्या राजू तुलालवार यांच्या फुग्यातला राक्षस, प्रवीण भारदे यांच्या हॅप्पी बर्थ डे व राजेश राणे यांच्या ‘डराव डराव’ या बालनाट्यांनी वेगवेगळे विषय रंगमंचावर जिवंत करून आपल्या नाट्यगुणांची झलक दाखवली.
त्यांच्या कलागुणांना रसिकांनी कौतुकाची थाप दिली. संमेलनपूर्व कार्यक्रमात सकाळच्या सत्रात गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या या बालनाट्यांचा मोखाडा येथील आदिवासीपाड्यातील शालेय विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. या वेळी महापौर संजय मोरे, हिराकांत फर्डे, दिग्दर्शक विजू माने, अशोक नारकर आदी मान्यवर उपस्थित होते.बालनाट्यातील बालकलाकारांकडून प्रामाणिकपणा शिकण्याची गरज आहे. इतक्या वर्षांनी नाट्यसंमेलनात बालनाट्याला प्राधान्य दिले गेले, याचा आनंद होतो. बालनाट्यांविषयी जागृती होण्याची गरज आहे. आदिवासीपाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत बालनाट्य पोहोचण्यासाठी शाळाशाळांत प्रयोग होण्याची गरज आहे. या आदिवासीपाड्यातील विद्यार्थ्यांमध्येही कलागुण दडलेले असतात. त्यांना प्रोत्साहन देऊन व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यातून चांगले कलाकार तयार होतील.
- पद्मश्री नैना आपटेविजय सुलताने लिखित आणि राजेश राणे यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेले हे नाटक या वर्षी झालेल्या राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरले. या नाटकाचे सादरीकरण संमेलनपूर्व कार्यक्रमात सादर झाले. दुष्काळाबाबत माणसांत सर्वत्र चर्चा होत आहे; पण या छोट्या जीवाचा कोण विचार करणार? बेडकाची हीच व्यथा मांडणारे हे नाटक. पर्यावरणाचा तोल बिघडत असताना बेडकाला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्याची होत असलेली घालमेल आदी गोष्टी या नाटकात मांडण्यात आल्या. वृक्षतोडीतून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्यातून बेडकाचे होत असलेले हाल दाखवत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश नाटकातून देण्यात आला.मोखाड्यातील विद्यार्थ्यांची लक्षवेधी हजेरी!
नाटक तळागाळातील सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे, हा नाट्यसंमेलनाचा मूळ हेतू साध्य व्हावा, यासाठी टॅग आणि परिवर्तन महिला संस्था यांच्यातर्फे मोखाडा येथील आदिवासीपाड्यातील शालेय विद्यार्थ्यांना बालनाट्य प्रयोग पाहण्यासाठी विशेष आमंत्रण देऊन बोलवण्यात आले. ज्या मुलांनी त्यांच्या आजवरच्या आयुष्यात कधीच नाटक पाहिलेले नाही, असे ६० विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. दिग्दर्शक विजू माने यांनी या मुलांना मेकअपसह वेगवेगळ्या तंत्राविषयीची माहिती दिली.राजू तुलालवार लिखित, दिग्दर्शित ‘फुग्यातील राक्षस’ या नाटकात आठ बालकलाकारांचा समावेश असून नाटकाची गोष्ट रवी व रिमा या बहीण-भावावर आधारित आहे. रवी अभ्यास करीत नाही, टीव्हीमध्येच मग्न असतो. त्याला एक फुगा मिळतो व त्यातून राक्षस बाहेर येतो. हा राक्षस त्याच्या आयुष्यात आल्यामुळे होणारे सकारात्मक बदल या नाट्यातून दाखविण्यात आले आहे. हल्ली मुले टीव्हीकडेच आकर्षित होत असल्याने त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे टीव्ही पाहणे कमी करावे आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे, असा संदेश यातून देण्यात आल्याचे तुलालवार यांनी सांगितले. या नाटकातील सर्व मुले ठाणे शहरातील आहेत.
माता अनसूया प्रॉडक्शनचे ‘हॅप्पी बर्थ डे’
प्रवीण भारदे लिखित आणि दिग्दर्शित ‘हॅप्पी बर्थ डे’ नाटकात १२ बालकलावंतांसह एकूण १९ कलावंतांनी संस्कारक्षम नाटक सादर करून रसिकांचे कौतुक कमावले. हल्लीच्या मुलांमध्ये उद्धटपणा व हट्टीपणा वाढत चालला आहे. ही मुले आपल्या पालकांकडे मागण्या मांडतात आणि त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्व मुले मिळून केक न कापण्याचा हट्ट धरतात. मग, या मुलांच्या स्वप्नात क्रांतिकारक येतात आणि त्यांच्यात्यांच्या वर्तणुकीतील चुका दाखवितात... अशी गोष्ट असलेले ‘हॅप्पी बर्थ डे’ रसिकांनी एन्जॉय केले. या नाटकात पद्मश्री नैना आपटे प्रमुख भूमिकेत आहेत.