सामाजिक भान जपलेले ग्राफिक डिझायनर
By Admin | Published: May 28, 2017 12:11 AM2017-05-28T00:11:11+5:302017-05-28T00:11:11+5:30
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टायपोग्राफिस्ट शशिकांत साठ्ये यांनी २२ मे रोजी वयाची ८३ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप...
- प्रा. सुरेश राऊत
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टायपोग्राफिस्ट शशिकांत साठ्ये यांनी २२ मे रोजी वयाची
८३ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप...
साठे सर, म्हणजे रूबाबदार व्यक्तिमत्त्व, जबाबदार वक्तृत्व, प्रत्येक गोष्ट म्हणजे मोजून मापून, कामाच्या वेळी काम व मजेच्या वेळी मजा हीच सरांच्या यशस्वी जीवनाची मनोरंजक कहाणी.
टायपोग्राफी हा साठे सरांचा आवडता विषय. सर त्याच्या नावातच टायपोग्राफीचे महत्त्व समजावून सांगत असत. प्रत्येक जण माझे नाव वेगवेगळ्या प्रकारे लिहितात व उच्चारही वेगवेगळ्या प्रकारे करतात तो असा..
SATHESATTHESATHYSATHAYE
साठेसाठ्ठे साठ्ये साठये
साठे सरांच्या बऱ्याचशा लेक्चर्समध्ये याचा उल्लेख असायचा. सर नेहमी म्हणत व्हिजिटिंग कार्ड म्हणजे त्या प्रोफेशनल व्यक्तीची व त्याच्या व्यवसायाची प्राथमिक ओळख. जेव्हा एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला वेळ ठरवून भेटायला जायचे असते, तेव्हा स्वागतकक्षातील व्यक्तीच्या बरोबर आपले कार्ड दिले जाते. ते पाहताच ही व्यक्ती कोण असू शकेल याची पूर्ण कल्पना त्या माणसाला होते.
सरांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांचे कामही शिस्तबद्ध. माझे विद्यार्थी इतर मित्रमंडळी यांना असेच शिस्तबद्ध वागावे अशी त्यांची अपेक्षा असते. कलेसाठी कला, मूड असेल तेव्हाच काम हा विचार त्यांना आवडत नसे. त्यांच्या कामातील शिस्त अंगवळणी पडल्यामुळे, आज जाहिरात क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत.
साठेसर जे.जे. इन्स्टिट्यूट आॅफ अॅप्लाइड आर्टमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेव्हा वांद्र्याच्या निवासस्थानापासून व्ही.टी.पर्यंत दररोज बी.ई.एस.टी.च्या बसमधून प्रवास करीत असत. रोजच्या रोज वेगळे प्रवासी, लहान थोर मंडळी, सुशिक्षित तर कधी अशिक्षित मुंबईच्या कॉस्मोपॉलीटीयन वातावरणात वाढलेले, वेगवेगळ्या भाषांतून शिकलेले लोक त्यातून प्रवास करायचे. अशा बहुभाषीय लोकांना तिकिटे देऊन इच्छित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी त्या कंडक्टरची, रांगेतून पुढे चला, दरवाजावर थांबू नका, ही त्याची विनंती किंवा मोठ्या आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला तरी ती किती जणांना समजणार? बरेच दिवस हा गोेंधळ ऐकल्यावर सर म्हणतात बोलण्यापेक्षा किंवा शब्दांपेक्षा चित्ररूपाने हा विचार लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक परिणामकारक होईल. एखादी व्यक्ती बसमध्ये आल्यावर काही वेळातच तिला बसायला जागा मिळेल. त्यासाठी चित्रमालिका तयार केल्यावर सरांनी तत्कालीन महापौर, बेस्ट प्रशासन व इतर अनेक अधिकाऱ्यांना समजावून सांगितली. परंतु सुरुवातीला कोणाला ते पटले नाही. शेवटी काही वर्षांनंतर ही चित्रमालिका प्रथमत: हुतात्मा चौक ते अंधेरीपर्यंत चालणाऱ्या बसमध्ये प्रयोगादाखल चित्रांकित करण्यात आली. त्याला प्रतिसाद काय आहे? ते जाणून घेण्यासाठी साठे सर नित्यनियमाने आठवडाभर त्याच बसमधून प्रवास करीत राहिले. प्रवाशांच्या एकंदरीत प्रतिक्रिया पाहून सरांचे मन आनंदून गेले.
सर्वसाधारणपणे प्रत्येकाला आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा जनरल हॉस्पिटलमध्ये जावेच लागते. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे कम्पाउंडर कोणत्या गोळ्या कधी घ्याव्यात ते समजावून सांगतात. पेशंटला सर्व सूचना लक्षात राहतील असे नाही. हाच अनुभव व विचार सरांनी ग्राफिक डिझाइनच्या स्वरूपात छोट्या पाकिटावर छापून घेतल्या. याचे महत्त्व आंतरराष्ट्रीय संस्थांना पटले आणि १९८१ साली त्यांना फिलिप्स अॅक्नोग्राडा हा पुरस्कार मिळाला. राजकारण्यांना पटायला मात्र फार वेळ लागला.
शिक्षक, शेजारी, नात्यातील मंडळी, सर्वांनी आपणावर संस्कार केले. मोठे केले, म्हणूनच आपण आज काहीतरी करू शकलो त्यामुळे आपलेही समाजाला काहीतरी देणे लागते. याच एका ध्येयाने प्रेरित होऊन सरांनी स्वत:च्या रोजच्या व्यवहारातील, अनुभवातील अगदी जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळायला सुरुवात केली व त्यातूनच त्यांना हे वेगवेगळे विचार ग्राफिक स्वरूपात मांडण्याची ऊर्जा मिळाली. त्याचा उत्तम फायदा आज समाजाला होतो आहे.
(लेखक रचना संसद कॉलेज आॅफ अॅप्लाईड आर्ट अॅण्ड क्राफ्टचे माजी प्राचार्य आहेत.)