साहित्य संमेलनातून सामाजिक भान

By admin | Published: December 22, 2015 01:36 AM2015-12-22T01:36:50+5:302015-12-22T01:36:50+5:30

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले साहित्य संमेलन दिमाखदार करण्याबरोबरच सामाजिक भान जपण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

Social Recognition Through Literary Meetings | साहित्य संमेलनातून सामाजिक भान

साहित्य संमेलनातून सामाजिक भान

Next

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेले साहित्य संमेलन दिमाखदार करण्याबरोबरच सामाजिक भान जपण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याची माहिती ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पिंपरी-चिंचवड येथे १५ ते १८ जानेवारी २०१६ या कालावधीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पी. डी. पाटील यांनी सोमवारी (दि. २१) ‘लोकमत’ ला सदिच्छा भेट दिली.
या वेळी त्यांनी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संमेलनाचे भव्यदिव्य स्वरूप, भरगच्च कार्यक्रम यांबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. या वेळी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन, समन्वयक सचिन ईटकर, लेखक अरुण शेवते आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पी. डी. पाटील म्हणाले, ‘‘ज्ञानोबांची आळंदी, तुकोबांचे देहू आणि मोरया गोसावींची समाधी असलेले चिंचवड या त्रिवेणी संगमावर पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी वसलेली आहे. संतांच्या या भूमीत साहित्य संस्कृती रुजविण्याच्या हेतूने येथे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. एका शैक्षणिक संस्थेला साहित्याची सेवा करण्याची मिळालेली संधी हा परमानंद आहे. डी. वाय. पाटील संस्थेला संमेलन मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर संमेलनाला अनोखे रूप द्यावे, असा विचार होता. संमेलनासाठी कोणाकडेही पैसे न मागता संमेलन स्वबळावर साकारायचे, हा निर्णय सर्वप्रथम घेतला. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरीशी साहित्यही जोडले जावे, हा संमेलनाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.’’
‘‘पिंपरी-चिंचवडशी असलेले जिव्हाळ्याचे नाते उलगडताना ते म्हणाले, ‘‘गेल्या ५३ वर्षांपासून माझी नाळ या नगरीशी जोडली गेली आहे. कर्मभूमीचे ॠण फेडता येत नाही. परंतु, संमेलनाच्या निमित्ताने या कर्मभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे,’’ असे त्यांनी सांगितले. ‘‘तरुणाई आणि साहित्य यांच्यात अतूट बंध निर्माण झाला पाहिजे. सध्याचा तरुण सोशल मीडिया, दूरदर्शन या चौकटीत अडकला आहे. त्याला या चौकटीतून बाहेर काढायचे असेल, अभिरुचिसंपन्न आणि समृद्ध करायचे असेल, तर संमेलनाचे स्वरूप भव्यदिव्य आणि आकर्षकच असले पाहिजे,’’ असे आग्रही प्रतिपादन पी. डी. पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, ‘‘संमेलनाची अद्ययावत वेबसाईट, साहित्यमित्र नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन यांची निर्मिती करण्यात आली असून त्याद्वारे संमेलनासंदर्भातील सर्व घडामोडी तत्काळ पाहता येतील. अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मराठी साहित्यातील नामवंत लेखकांची पुस्तके, भाषणे, विचार यांचा खजिना तरुणाईसमोर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. उद्योगनगरी व साहित्य यांचा अनोखा मिलाप असणारे बोधचिन्ह संमेलनाची शान वाढविणार आहे. हे बोधचिन्ह अ‍ॅनिमेशन स्वरूपातही उपलब्ध आहे. या बोधचिन्हासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत १३० जणांनी सहभाग नोंदविला होता. मापलेकर भगिनींनी त्याची निर्मिती केली आहे.’’ या संमेलनाच्या व्यासपीठावर १२ माजी संमेलनाध्यक्ष, ४ विश्व संमेलनाध्यक्षांचा सत्कार होणार असल्याचे,’’ पी. डी. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुण्यातील साहित्य महामंडळाच्या कारकिर्दीतील या संमेलनात यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. दुष्काळग्रस्तांना मदत, ज्ञानपीठकारांच्या मुलाखती, संमेलनाध्यक्षांची मुलाखत अशा आगळ्या उपक्रमांनी हे संमेलन अधोरेखित होईल. पी. डी. पाटील यांच्यासारखे दानशूर व समृद्ध स्वागताध्यक्ष लाभल्याने ८९वे साहित्य संमेलन गाजेल.- सुनील महाजन,
कोषाध्यक्ष, साहित्य महामंडळ

Web Title: Social Recognition Through Literary Meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.