समाजवादी नेते गोपाळ दुखंडे यांचे निधन
By admin | Published: June 14, 2017 12:44 AM2017-06-14T00:44:13+5:302017-06-14T00:44:13+5:30
ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दत्ताराम दुखंडे (७४) यांचे मंगळवारी सकाळी सावंतवाडीतील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दत्ताराम दुखंडे (७४) यांचे मंगळवारी सकाळी सावंतवाडीतील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, तत्पूर्वी त्यांचे पार्थिव मुंबईतील गोरेगाव येथील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रा. दुखंडे यांच्यावर अलीकडेच हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे सक्रिय आंदोलनांतून ते काहीसे दूर झाले होते. मात्र सोमवारी रात्रीही त्यांनी ११ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू
लागले. त्यामुळे डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. प्रा. दुखंडे यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, संतोष व संदीप ही दोन मुले (नोकरीनिमित्त हाँगकाँग व चीन येथे), मुलगी सोनाली (ठाणे) असा परिवार आहे.
प्रा. दुखंडे हे मूळचे मालवण-त्रिंबक येथील होते. त्यांचा जन्म १ जून १९४३ रोजी झाला. वडील गिरणी कामगार असल्याने त्यांचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. विद्यार्थी दशेत गोरेगाव येथे राहात असतानाच ते समाजवादी चळवळीकडे वळले.
मराठवाड्यात बीएड महाविद्यालये मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अनेक महाविद्यालयांनी निकष पूर्ण न केल्यामुळे सरकारने संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून मोठे आंदोलन पेटले. दुखंडे यांनी त्यावर सरकारला एक फॉर्म्युला तयार करून दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले नाही. हा ‘दुखंडे फॉर्म्युला’ चांगलाच गाजला होता.
देहदानाची इच्छा
प्रा. दुखंडे यांची देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. सोमवारी रात्रीही कार्यकर्त्यांशी चर्चा करताना ते देहदानाबाबत बोलत होते.त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केली़ मंगळवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले़