तृतीयपंथीयांचे जग उद्ध्वस्त करणारा समाज खलनायक
By Admin | Published: June 11, 2016 12:58 AM2016-06-11T00:58:32+5:302016-06-11T00:58:32+5:30
साहित्यात दलित साहित्याचा पूर आला होता, भटके, आदिवासींचे साहित्य निर्माण झाले.
पुणे : साहित्यात दलित साहित्याचा पूर आला होता, भटके, आदिवासींचे साहित्य निर्माण झाले. परंतु तृतीयपंथीयांविषयी साहित्य निर्माण झाले नाही. तृतीयपंथीयांना स्वत:लाच स्वत:विषयी लिहावे लागते, समाजाला सांगावे लागते, ही दुर्दैैवी बाब आहे. तृतीय पंथ हे प्राकृतिक सत्य म्हणून आपण स्वीकारले पाहिजे, स्त्रियांचा जन्म नाकारणारा समाज नालायक आहे तर तृतीय पंथीयांचे जग उद्ध्वस्त करणारा समाज खलनायक आहे, तृतीयपंथीयांना न्याय देण्यात सरकारचा पुरुषार्थ असायला हवा, असे परखड विचार ज्येष्ठ समीक्षक आणि संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
सूर्यकांत तिवडे लिखित ‘तृतीयपुरुषी शून्य वचनी’ या कादंबरीच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सदानंद शेट्टी, किन्नर समाजासाठी काम करणारे सलमा खान, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, लेखक सूर्यकांत तिवडे व प्रमोद आडकर उपस्थित होते.
आभार आनंद पायाळ यांनी मानले. (प्रतिनिधी)
>सबनीस म्हणाले, कादंबरीवरून चित्रपट होणे याला मोठी परंपरा आहे, परंतु ही परंपरा मोडीत काढून सूर्यकांत तिवडे यांनी चित्रपट कथेवरून कादंबरी लिहिण्याचे क्रांतिकारी पाऊल साहित्य क्षेत्रात टाकले आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्तव्य बजावले नाही, साहित्यिकांनी मात्र या समस्येला हात घातला ही आनंदाची बाब आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी जे शेतकऱ्यांसाठी काम केले ते सरकारला शक्य झाले नाही. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करणारी भारतीय राज्यघटना तृतीयपंथीयांच्या बाबतीत पराभूत आहे. तृतीय पंथीयांचे प्रश्न आजतागायत आहे तसेच आहेत. विकृती आणि प्रकृतीच्या व्याख्या मानवी संस्कृतीने ठरविल्या आहेत. या मानवी संस्कृतीचे मूल्यमापन केले गेले पाहिजे.
तृतीयपंथीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सलमा खान म्हणाल्या, किन्नर समाज दुर्लक्षित आहे, त्यामुळे या समाजाची अत्यंत दुर्गती झाली आहे. किन्नरांना जगण्याचे साधन नाही. समाजाने किन्नरांचा स्वीकार केलेला नाही. त्यांना माणूस मानले जात नाही, हे बदलले पाहिजे.