सोसायटीचा छोटा; पण गुणी ‘परिवार’
By admin | Published: June 8, 2017 02:18 AM2017-06-08T02:18:44+5:302017-06-08T02:18:44+5:30
गोरेगाव पूर्वेकडील ‘परिवार को-आॅपरेटिव्ह- हाउसिंग सोसायटी’ ही सोसायटी आकाराने लहान असली, तरी या सोसायटीने वेगळा लौकिक प्राप्त केलेला आहे
सागर नेवरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील ‘परिवार को-आॅपरेटिव्ह- हाउसिंग सोसायटी’ ही सोसायटी आकाराने लहान असली, तरी या सोसायटीने वेगळा लौकिक प्राप्त केलेला आहे. या इमारतीचे बांधकाम १९९४ साली सुरू होऊन १९९७ साली ते पूर्ण झाले. ही इमारत ७ मजली असून, येथे ३० कुटुंब गुण्यागोविंदाने राहतात. ज्येष्ठ नागरिक संघ, अत्रे कट्टा-मुक्त व्यासपीठ, जॉगर्स मॉर्निंग वॉकर आणि गोरेगाव महिला मंडळ इत्यादी उपक्रमांत सोसायटीतील सदस्य सहभागी होतात. तसेच सोसायटीमध्ये १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी ध्वजवंदन उत्साहात साजरे होते. लहान मुलांसाठी सांस्कृतिक आणि खेळाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ठेवला जातो. दरवर्षी २ आॅक्टोबरला स्नेहमेळाव्याचे आयोजन केले जाते. दरवर्षी सामूहिक सहलीचेही आयोजन करण्यात येते.
सोसायटीमध्ये जागेचा अभाव असल्याकारणाने जयप्रकाशनगर परिसरातील उद्यान आणि जिमखान्याचा वापर लहान मुले आणि सदस्य करतात. सोसायटीमधील कमिटी ९ सभासदांची असून, त्यात ४ महिलांचा सहभाग आहे. सोसायटीमधील ३० सभासदांचा व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला आहे. त्यात आठवड्याला होणाऱ्या बैठकीसंदर्भात सभासदांबरोबर संवाद साधला जातो. त्यात सोसायटीविषयी सर्व गोष्टींवर चर्चा होते. सोसायटीच्या परिसरात धूम्रपान, मद्यपानास सक्त मनाई आहे. सर्वधर्मीय लोक या सोसायटीत राहतात. एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होतात. सगळ््या प्रकारचे सण साजरे केले जातात. सोसायटीमध्ये जागेच्या कमतरतेमुळे कार्यक्रम आणि उपक्रमांसाठी कार्यालयाचा वापर केला जातो. डॉ. कविश्वर यांच्याकडून सोसायटीच्या सभासदांची नियमित रक्त तपासणी केली जाते.
अत्यंत कमी जागा असूनही सोसायटीने नारळ, जांभूळ, पिंपळ, बदाम, फणस ही मोठी झाडे जोपासली आहेत. पावसाळ््यात छोट्या फुलबागेचे काम करण्यात येणार आहे. कचरा बाहेर टाकण्यास मनाई केली जाते. सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे विभाजन करून विल्हेवाट लावली जाते. ही सोसायटी पूर्णपणे टँकरमुक्त आहे. पाण्याचे नियोजनही उत्तम प्रकारे केले जाते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सदस्यांचा पुढाकार असतो. सोसायटीच्या परिसरात १ बोरवेल असून, त्या पाण्याचा झाडांना, वाहने धुण्यास तसेच शौचालयासाठी वापर केला जातो. महापालिकेच्या पाण्याच्या २ टाक्या असून, १ टाकी केवळ बोरवेलच्या पाण्याची आहे. २ सुरक्षारक्षक आणि १ सफाई कामगार सोसायटीत सदैव तैनात असतात. परिवार सोसायटी पूर्णपणे तंटामुक्त आहे. काही वेळा किरकोळ भांडण झाले, तरी लेखी स्वरूपात तक्रार स्वीकारली जाऊन सामोपचाराने भांडण सोडविले जाते. चैतन्य भोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सोसायटीत लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.
>पोलिसांना
अशी होते मदत
परिसरात एखादा गुन्हा झाला तर परिवार सोसायटीची पोलिसांना मदत होते. या सोसायटीत ८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सोसायटीच्या बाजूने रस्ते असल्यामुळे सगळ्या जाणाऱ्या-येणाऱ्यांचे रेकॉर्डिंग या कॅमेऱ्यांमध्ये होते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा हे सीसीटीव्ही फूटेज गुन्ह्यांचा माग काढताना उपयोगी पडते.
सोलारमार्फत खतनिर्मिती
सोलार यंत्रणेवर चालणाऱ्या मशिनचा वापर करून ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार करण्याचे काम सध्या सोसायटीमध्ये सुरू आहे. हा प्रकल्प अन्य सोसायट्यांसाठीही आदर्श ठरणार आहे.
रमेश प्रभू यांचे सहकार्य
रमेश प्रभू अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे सदस्यत्व ‘परिवार को-आॅपरेटिव्ह- हाउसिंग सोसायटी’कडे आहे. तसेच सुरुवातीच्या काळात सोसायटीला अनेक
समस्यांचा सामना करावा लागला होता. तेव्हा रमेश प्रभूंनी मदत केल्याची आठवण सदस्यांनी सांगितली.
सहभागासाठी आवाहन
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘आमची सोसायटी, आमचं कुटुंब’ या उपक्रमात आपल्या गृहनिर्माण संस्थेला सहभागी व्हायचे असल्यास आपण lokmat.mahasewa@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता.