सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:38 AM2018-08-20T01:38:40+5:302018-08-20T01:39:20+5:30
देशाच्या संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा एक मूलभूत अधिकार बहाल केला आहे, त्यावर रोख लावणारे तुम्ही कोण? असा प्रश्न खरे तर प्रत्येक सामान्य नागरिकांना पडायला हवाय.
दिवसागणिक किड्या-मुंग्यांसारखी माणसे मरतात, त्याचे काय? असे प्रश्न विचारणाऱ्या राज्यकर्त्यांच्या एका असंवेदनशील समाजात आपण राहत आहोत. देशाच्या संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा एक मूलभूत अधिकार बहाल केला आहे, त्यावर रोख लावणारे तुम्ही कोण? असा प्रश्न खरे तर प्रत्येक सामान्य नागरिकांना पडायला हवाय. पण असे प्रश्न कुणाच्या मनात निर्माणच होत नाहीत कारण प्रत्येक जण कुठल्या ना एका अनामिक दडपणाखाली वावरत आहे. एक प्रकारचे अंधकारमय वातावरण आहे, एक कमालीची अस्वस्थता पसरली आहे. परंतु ही परिस्थिती आजची आहे का? तर नाही! ज्यांनी प्रथा, धर्म, व्यवस्थेमधील चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला. त्यांना प्राणाची किंमत मोजावीच लागली आहे. आजच्या एकविसाव्या शतकातही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. ज्यांनी धर्माची चिकित्सा मांडणी करीत धर्म अभ्यासकांसमोर काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले, त्यांच्याशी वैचारिक लढा न देता बंदुकीच्या गोळ्यांमधून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. कालबाहय विचारांवर फुली मारत बदलत्या काळाशी सुसंगत मांडणी केली त्यांचाच आवाज दाबण्यात आला. परिवर्तनाची पताका आयुष्यभर हाती घेत विवेकी विचार रुजविणाºया डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या विचारवंतांना संपविण्यात आले. भरदिवसा या विचारवंतांचे खून झाले, पण त्याचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणा आणि शासन कुचकामी ठरले. हे सगळं होत असताना एक नागरिक आणि कलावंत म्हणून आपली जबाबदारी नक्की काय? असा प्रश्न नाटककार अतुल पेठे यांना भेडसावू लागला. मात्र त्यांच्यासमोर अभिव्यक्तीचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे ‘नाटक’! यातूनच पुरोगामी विचारांची एक लढाई सुरू झाली. व्यक्ती गेल्या तरी त्यांचे विचार संपत नाहीत हा एक विचार रुजविण्याचा प्रयत्न झाला तो ‘रिंगण’नाट्यातून. निषेधाला माध्यम मिळाले आणि विवेकशील विचारांची एक फळी युवकांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली.
याविषयी ‘लोकमत’शी अतुल पेठे म्हणाले, की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर एक जबाबदार नागरिक, कलावंत म्हणून मी हादरलो होतो. त्यांचे विचार मला माहिती होते. त्यांच्याबरोबर हिंडण्याची आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळाली होती. त्यांचे विचार मला परिचित होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता नव्हतो पण त्याचा पुरस्कर्ता मात्र नक्की होतो. समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत हा महत्त्वाचा मुद्दा होता. संविधानाचा आधार घेऊन लोकशाही परंपरेमध्ये आपल्याच अनेक गोष्टींना धर्म, रूढींना प्रश्न विचारू शकतो. ते विचारले तर चुकीच्या रूढी नष्ट होतात. प्रश्न विचारल्यामुळे समाजजीवन पुढे जातो हा दाभोलकरांचा विचार मला पटला. शास्त्रीय दृष्टिकोन बाळगत नाही तोवर सामाजिक आणि वैचारिक दारिद्र्य दूर करू शकत नाही. पण दाभोलकर देवधर्माच्याविरोधात आहेत, असा अपप्रचार केला गेला. त्यांचा खून झाला तेव्हा राजू इनामदार यांच्या सहकार्याने ‘रिंगण’नाट्याचा जन्म झाला. मी नाटकवाला असल्याने नाटकाच्या माध्यमातून अंधश्रद्धेची चार सूत्रे घेऊन जाऊ शकतो आणि मित्राच्या खुनाचा विधायक मार्गाने निषेध नोंदवू शकतो.