डॉक्टरच ठरतात सॉफ्ट टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 01:06 AM2016-10-17T01:06:05+5:302016-10-17T01:06:05+5:30

डॉक्टरवर्गाला समाजातील विविध घटकांकडून अनेकदा सॉफ्ट टार्गेट बनविले जात असल्याची खंत बी. जे. मेडिकल महाविद्यालय व ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली.

Soft Target for a Doctor | डॉक्टरच ठरतात सॉफ्ट टार्गेट

डॉक्टरच ठरतात सॉफ्ट टार्गेट

Next


पुणे : आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावत असताना डॉक्टरवर्गाला समाजातील विविध घटकांकडून अनेकदा सॉफ्ट टार्गेट बनविले जात असल्याची खंत बी. जे. मेडिकल महाविद्यालय व ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली.
आठव्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महापौर प्रशांत जगताप, राजेंद्र पवार, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अ‍ॅड. सुधाकर आव्हाड, स्वस्तिक सिरसीकर, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. प्रविण शिनगारे, उज्ज्वल ठेंगडी, डॉ. सुनील मांजरेकर, प्रा. मधुमती कुंजल, प्रा. लक्ष्मी झमन, विश्वदीप कुंजल, प्रा. अस्मिता दाणी, स्नेहल तावरे व डॉ. संजयकुमार तावरे व्यासपीठावर उपस्थित होते.
बी. जे. मेडिकल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तांबे यांनी लिहीलेल्या ‘कुमारी माता : वैद्यकीय व कायदेशीर तरतुदी’ या स्नेहवर्धन प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘किडनी रॅकेटमध्येही डॉक्टरांना टार्गेट करण्यात आले होते. अनेकदा डॉक्टरांना विनाकारण जेलमध्येही जावे लागते. त्यामुळे शासन, कायदेतज्ज्ञ आणि सर्वसामान्य नागरीकांनीही डॉक्टरांशी निगडीत असणाऱ्या कायद्यांबाबत जागरुक असायला हवे. या सर्व गोष्टींबाबत खोलवर विचार व्हायला हवा.’’
प्रशांत जगताप म्हणाले, आजही कुमारी मातांसारखे संवेदनशील विषय पुढे येत नाहीत. अशा प्रकारच्या प्रश्नावर मार्ग काढायचा असेल तर पालकांनी आपली भूमिका बदलण्याची आवश्यकता आहे. मुलांना योग्य वेळी योग्य गोष्टींबाबत माहीती देणे आवश्यक आहे.
>अधिकाराविषयी चर्चा व्हावी
मुलींवर संस्कार होतात, मात्र मुलांवरही आपण तितकेच संस्कार करतो का हा प्रश्न पालकांनी स्वत:लाच विचारायला हवा. मुलींचे अधिकार, पुरुषांवर असणारी जबाबदारी, संस्कार यांसारख्या मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. कुमारी मातेसारख्या समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आपण काय करु शकतो याबाबत विचार व्हायला हवा, असे डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या.

Web Title: Soft Target for a Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.