माती नमुना तपासणी दुपटीने महागली !

By admin | Published: July 22, 2014 12:05 AM2014-07-22T00:05:10+5:302014-07-22T00:05:10+5:30

मृद सर्वेक्षण व मृद चाचणीत झाली दरवाढ

Soil sample checks twice! | माती नमुना तपासणी दुपटीने महागली !

माती नमुना तपासणी दुपटीने महागली !

Next

खामगाव : देशात बियाणे आणि इतर शेतीपयोगी वस्तूंच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. ही वाढ शेतकर्‍यांच्या मुळावर उठली असताना, आता माती नमुना तपासणीच्या दरातही जवळपास दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
पावसाचा लहरीपणा, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे गत काही वर्षांत शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. अशा परिस्थितीतही संकटाशी सामना करीत नव्या उमेदीने उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करतातच. अस्मानी आणि सुलतानी संकटांशी झुंजताना, वाढती महागाई शेतकर्‍यांसाठी त्रासदायक ठरत आहे. बी-बियाणे, रासायनिक खते, औषध, कीटकनाशक यासारख्या शेतीपयोगी वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना आता जमिनीची सुपिकता तपासणेही महागात पडणार आहे.
मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळांकरिता लागणारे काचेचे साहित्य व रसायनांची झालेली दरवाढ, आधुनिक उपकरणांची देखभाल आणि दुरूस्ती खर्चात झालेली वाढ, वाढलेले वीज दर तसेच कर्मचार्‍यांचे वेतन व भत्त्यात झालेली वाढ, आदी कारणांमुळे मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळांच्या माती नमुने तपासणी शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही शुल्कवाढ १८ जुलै २0१४ पासून लागू करण्यात येणार आहे.

** राज्यातील २९ केंद्रांमध्ये सुधारित दर

राज्यातील शेतकर्‍यांच्या शेतमातीचे नमुने तपासण्याच्या दरात शासनाने जवळपास दुपटीने वाढ केली असली तरी, पाणी नमुना चाचणीत शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. पाणी नमुना तपासण्यासाठी पूर्वी शंभर रूपये (प्रति नमुना) दर आकारला जायचा. आता पन्नास टक्के कमी म्हणजेच प्रति नमुना ५0 रूपये कमी करण्यात आले आहेत.
पाणी तपासणीत दिलासा
महाराष्ट्रात २९ ठिकाणी मृद सर्वेक्षण व मृद चाचणी तपासणी प्रयोगशाळा आहेत. या शाळांमध्ये सर्वसाधारण मृद नमुन्यांची तपासणी, सूक्ष्म मूलद्रव्ये मृद, विशेष मृद नमुना आणि सिंचनाच्या उपयोगासाठीच्या पाण्याच्या नमुना तपासणीकरिता सुधारित शुल्क आकारण्यास शासन मान्यता देण्यात आली.

Web Title: Soil sample checks twice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.