माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या दारी!
By admin | Published: May 23, 2016 04:50 AM2016-05-23T04:50:42+5:302016-05-23T04:50:42+5:30
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घ्यावे, यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणाची प्रयोगशाळा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन येणार आहे.
राहुल कलाल , पुणे
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घ्यावे, यासाठी कृषी विभाग आता माती परीक्षणाची प्रयोगशाळा थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन येणार आहे.
शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो. दिवसरात्र राबतो. मात्र अनेकदा पीक चांगले येत नाही. यामागचे प्रमुख कारण शेतीतल्या मातीत अन्नघटकांची कमतरता असते. पीकांना हवे ते अन्नघटक मातीतून न मिळाल्याने उत्पादन घटते. हे ओळखून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतल्या मातीत कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे कळावे यासाठी जिल्हा स्तरावर मृदा परिक्षण व चाचणी प्रयोगशाळा आहेत. सध्या राज्यात अशा २९ प्रयोगशाळा आहेत. मात्र जिल्ह्यांचा विस्तार मोठा असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना मातीचे नमुने येथे घेऊन येणे जिकीरीचे होते. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून कृषी विभागाने हे पाऊल उचलले आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून काही खासगी कंपन्यांनी पोर्टेबल म्हणजे कोठेही, कधीही नेता येऊ शकणारी माती तपासणी यंत्रे बनवली आहेत. त्याचे परिणामही अचूक आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. या मशीन्स सुमारे ७५ हजारांना मिळतात. त्यामुळे त्या तालुका स्तरावर उपलब्ध करण्याचा प्रयत्न कृषी विभाग करीत आहे. अलिकडेच पुण्यात कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यात कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. त्याला खडसे यांनी हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच ही यंत्रे कृषी विभागाकडे येणार आहेत.