सोलापूर चक्काजाम आंदोलन; चोख बंदोबस्तासाठी 2100 पोलिसांचा ताफा तैनात
By admin | Published: January 30, 2017 04:58 PM2017-01-30T16:58:02+5:302017-01-30T16:58:02+5:30
३१ जानेवारी रोजी पुकारलेले चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 30 - सकल मराठा समाजाच्या वतीने ३१ जानेवारी रोजी पुकारलेले चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. आंदोलन होणाऱ्या सात ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी समन्वयाची भूमिका ठेवून आंदोलनाला गालबोट लागू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या शांततेच्या मार्गाने यापूर्वी सोलापुरात निघालेल्या मोर्चाप्रमाणेच चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात सहभागी होणारी संख्या लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून पोलीस आयुक्तांनी सकाळी ११ ते ३ या वेळेत जुना पुणे नाका, पुलाखाली, जुना तुळजापूर नाका, शांती चौक, अक्कलकोट रोड, आयटीआय चौक, भैय्या चौक, मार्केट यार्ड येथे अॅब्युलन्स, क्रेन, डीपरसह प्रत्येकी ठिकाणी ३० असा २१०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यावर नियंत्रणासाठी स्वत: पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, सहा. पोलीस आयुक्त अशी यंत्रणा कार्यरत असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी स्पष्ट केले.