‘तरुण-तुर्कां’च्या चक्रव्यूहात सोलापूर जिल्हा !

By admin | Published: February 18, 2017 01:55 AM2017-02-18T01:55:16+5:302017-02-18T01:55:16+5:30

खुले अध्यक्षपद जि. प. अध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आहे. त्यामुळे या संधीचे सोने कसे करायचे, याचे नियोजन जिल्ह्यातील सर्वच नेते पक्षाच्या

Solapur district in the cyclone of 'Tarun-Turk' | ‘तरुण-तुर्कां’च्या चक्रव्यूहात सोलापूर जिल्हा !

‘तरुण-तुर्कां’च्या चक्रव्यूहात सोलापूर जिल्हा !

Next

राजा माने / सोलापूर
खुले अध्यक्षपद जि. प. अध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आहे. त्यामुळे या संधीचे सोने कसे करायचे, याचे नियोजन जिल्ह्यातील सर्वच नेते पक्षाच्या पलीकडे जाऊन करू लागले आहेत. संजय शिंदे, आ. बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे. ११ तालुके आणि ६८ जि. प. सदस्यांच्या गणितात मोहिते-पाटील घराणे आणि त्यांचे विरोधक हे त्रैरासिक मांडले जात आहे. त्या गणितात माळशिरस तालुक्यात असणारे सर्वाधिक ११ तर पंढरपूर तालुक्यातील असलेले ८ सदस्य कोणाचे राहतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. शेवटी राष्ट्रवादीची शक्ती नाकारली नाही तरी चक्रव्यूहाचा छेद आघाड्यांच्या आधारानेच होणार, हे नक्की!

बालेकिल्ल्याची भाषा आता कालबाह्य ठरू लागली आहे. राजकारणाच्या बदललेल्या त्या भाषेत सोलापूर जिल्ह्याचे राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणाचा रंग आणि स्मार्ट सिटी सोलापूर शहराच्या राजकारणाचा रंग जसा भिन्न आहे, तसाच ढंगही भिन्नच ! त्याच कारणाने देश आणि राज्याच्या राजकारणावर हुकूमत गाजवतानाही शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाचे शहर व ग्रामीण अशी विभागणी आणि मांडणी अपरिहार्यपणे केली. त्याच विभागणीचे पडसाद सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही थोड्याफार फरकाने दिसतात. गेल्या १५ वर्षांत अनेक नवे प्रवाह तयार झाले. त्या प्रवाहांनी ‘तरुण-तुर्कां’ची नवी फळी राजकारणात तयार झाली. सहकार, कृषी आणि उद्योग क्षेत्रात झेप घेण्याबरोबरच राजकारणातही संघर्ष करण्याची तयारी असणाऱ्या या फळीने राजकारणाचा ढाचाच बदलून टाकला. त्या ढाचाची झलक जिल्ह्याने स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत अनुभवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांचे हुकमी संख्याबळ असताना भाजप पुरस्कृत तरुण-तुर्कांचे प्रतिनिधी प्रशांत परिचारक विक्रमी मतांनी विजयी झाले. अशाच अनेक संदर्भांचे गाठोडे वाहत जिल्ह्याचे राजकारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. ६८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेवर झेंडा कोणाचा फडकणार, या गणिताची मांडणी करताना राजकारणातील एक आव्हानात्मक चक्रव्यूह तयार झाला आहे. हा चक्रव्यूह कसा भेदायचा याची व्यूहरचना प्रत्येक तालुक्याच्या शिलेदारांच्या कौशल्य व क्षमतेवर अवलंबून राहणार आहे.
भारतीय जनता पक्षाने आ. प्रशांत परिचारक, संजय शिंदे, राजेंद्र राऊत, उत्तम जानकर, समाधान आवताडे यांना साथीला घेऊन जिल्ह्याच्या राजकारणावर पक्षाची पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख व भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी तशी मोर्चेबांधणी करून बार्शीचे शिवसेना नेते व माजी आमदार राजेंद्र राऊत यांची पूर्ण टीमच भाजपच्या तंबूत मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने आणली.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या राजकारणाचा रंग पाहिला तर चक्रव्यूहाचा बराचसा अंदाज येऊ शकतो. माळशिरस तालुक्यात ११ जि. प. सदस्य आहेत. भाजपचे उत्तम जानकर यांचाच अर्ज बाद झाल्याने आता त्या तालुक्यातील खा. विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खा. रणजितसिंह यांना व्यूहरचना तशी सोपी झाली आहे. शिवसेना नेते धवलसिंह मोहिते-पाटील यांचा किती प्रभाव पडणार हाही प्रश्नच आहे. पंढरपूर तालुक्यात आ. प्रशांत परिचारक यांनी भाजपचे साटेलोटे कायम राखत मांडणी केली आहे. आ. भारत भालके, कल्याणराव काळे यांच्या गटाची शक्ती आहेच. माढा तालुक्यात आ. बबनदादा शिंदे यांचे दोन चिरंजीव, एक पुतण्या व भाऊ संजय शिंदे यावेळी जि. प., पंचायत समितीच्या निवडणूक मैदानात
आहेत. राष्ट्रवादी आणि अपक्ष असे निष्ठावंत उमेदवार शिंदे बंधूंकडे
आहेत. त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आ. धनाजी साठे, त्यांचे पुत्र दादासाहेब साठे तसेच शिवाजी सावंत यांनीही आपली शक्ती पणाला लावली आहे.
बार्शी तालुक्यात राजेंद्र राऊत अचानक भाजपमध्ये गेले. त्यामुळे आता माजी मंत्री दिलीप सोपल यांची निवडणूक मोर्चेबांधणी कशी राहणार, हा औत्सुक्याचा विषय आहे. मोहोळ तालुक्यात खा. धनंजय महाडिक यांनी मनोहर डोंगरे व विजयराज या पितापुत्रांच्या साथीने माजी आ. राजन पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. करमाळा, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा तालुक्यात नेहमीचीच गटबाजी दिसेल. तर उत्तर तालुक्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती दिसते आहे.
अक्कलकोट तालुक्यात माजी मंत्री आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना आपले अस्तित्व मजबूत करण्याची संधी दिसते आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पाळेमुळे खणून काढण्याचा प्रयत्न प्रत्येक तालुक्यातील गटबाजीतून निर्माण झालेल्या राजकीय शत्रुत्वाचा आधार घेत करण्यात आला. त्यातूनच आघाड्यांचे राजकारण जिल्ह्यात सुरू आहे. त्याचा परिणाम निवडणूक निकालावर निश्चितच होणार आहे. तो निकालच ‘तरुण-तुर्कां’नी रचलेला चक्रव्यूह कोणी, कसा भेदला हे स्पष्ट करणार आहे.

Web Title: Solapur district in the cyclone of 'Tarun-Turk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.