उजनीत पाणी आल्याखेरीज सोलापूरला नाही
By admin | Published: November 30, 2015 02:00 AM2015-11-30T02:00:02+5:302015-11-30T02:00:02+5:30
जिल्ह्यातील इतर धरणांमधून उजनी धरणात पाणी आल्याखेरीज सोलापूरकडे पाणी सोडण्यात येऊ नये; असे महत्त्वाचे ठराव इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई
इंदापूर : जिल्ह्यातील इतर धरणांमधून उजनी धरणात पाणी आल्याखेरीज सोलापूरकडे पाणी सोडण्यात येऊ नये; असे महत्त्वाचे ठराव इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत एकमताने संमत करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार सूर्यकांत येवले या वेळी उपस्थित होते. भरणे म्हणाले की, यंदाच्या वर्षी तालुका दुष्काळाशी सामना करतो आहे.
उन्हाळ्यापर्यंत परिस्थिती अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे आता जरी टंचाई निवारणाचा आराखडा पंचायत समितीने तयार केला असला, तरी आगामी काळात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या गावांची यादी त्या त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी तयार करावी. ग्रामस्थांच्या सूचनांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात यावा. टँकर भरण्याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी अधिकारी व उपस्थित सरपंच-उपसरपंचांना केली.
बैठकीच्या वेळी तरंगवाडी तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी बाळा ढवळे यांनी केली. विजय शिंदे यांनी वरच्या धरणांमधून दहा टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे, असा ठराव मांडला.
जर वरच्या धरणांमधून उजनी धरणात पाणी आले नाही, तर उजनी धरणात असलेले पाणी सोलापूरकडे सोडण्यात येऊ नये, अशी उपसूचना अॅड. नितीन कदम यांनी मांडली. अशाच आशयाचा ठराव पंचायत समिती सदस्य प्रताप पाटील यांनी मांडला. हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
तहसीलदार सूर्यकांत येवले, माजी गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी टंचाईचा आढावा घेतला. पंचायत समितीच्या सभापती डॉ. सोनाली ननवरे, श्रीमंत ढोले, प्रदीप गारटकर यांनी सूचना मांडल्या. बैठकीस उपसभापती नारायण वीर, माऊली चवरे, माऊली वाघमोडे, ऋतुजा पाटील,बापू चंदनशिवे व इतर कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.