Solapur Election - सोलापुरात दिग्गजांचा सुपडा साफ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 06:41 PM2017-02-23T18:41:56+5:302017-02-23T18:41:56+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का देण्याची व्यूहरचना जिल्ह्यातील तरुण तुर्कांच्या मदतीने भाजपने आखली होती
राजा माने
सोलापूर, दि. 23 - १९६२ पासूनच्या काँग्रेस बालेकिल्ल्यास भुईसपाट करीत भाजपने अनेक दिग्गजांचे महापालिका निवडणुकीत सुपडा साफ केला. विद्यमान महापौर, उपमहापौर आणि अनेक माजी महापौरांबरोबरच काँग्रेससह राष्ट्रवादी व कॉ. आडम मास्तर यांच्या माकपलाही जबरदस्त धक्का दिला. जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का देण्याची व्यूहरचना जिल्ह्यातील तरुण तुर्कांच्या मदतीने भाजपने आखली होती. परंतु ती मोहीम मात्र राष्ट्रवादी पक्षाने ग्रामीण भागात काही अंशाने रोखली आहे.
१०२ जागांच्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि भाजपच्या थिंक टँकने केलेली मोर्चेबांधणी जबरदस्त यशस्वी झाल्याची प्रचिती निवडणूक निकालाने आज दिली. काँग्रेसची भिस्त सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या आमदार कन्या प्रणिती यांच्यावरच होती. त्यांनी शहरात राबविलेल्या प्रचार मोहिमेला सोलापूरकरांनी साफ नाकारले आणि काँग्रेसला केवळ १४ जागांवर शांत बसावे लागले. याउलट एमआयएमसारख्या पक्षाने तब्बल ९ जागा जिंकत आपले अस्तित्व नव्याने निर्माण केले. भाजपच्या दोन देशमुखांमधील तथाकथित वादांचाही या निवडणुकीवर काडीचाही परिणाम झाला नाही आणि भाजपने निर्विवादपणे ४९ जागा खिशात टाकल्या.
महापालिकेच्या सत्ताकारणात दीर्घकाळ स्व. तात्या तथा विष्णुपंत कोठे यांची प्रमुख भूमिका राहिली होती. तीच भूमिका वठविण्याच्या इराद्याने त्यांचे चिरंजीव महेश कोठे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन तब्बल २१ जागा सेनेच्या खात्यात जमा केल्या. राष्ट्रवादीचे सर्व नेते तर या निवडणुकीत पराभूत झालेच झाले; पण त्यांचे संख्याबळही केवळ ४ वर येऊन ठेपले. बसपाने चार जागा सुरक्षित केल्या. एकूणच एका ऐतिहासिक विजयाची नोंद करताना भाजपच्या सुभाषबापू व मालकांनी महापालिकेत जबरदस्त ‘दे धक्का’ मोहीम यशस्वी केली.
बार्शीच्या राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी यशस्वी गळ लावण्याचा प्रयोग भाजपने जि.प.-पंचायत समिती निवडणुकीत केला. तो काहीअंशी यशस्वीही झाला. प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातील आघाड्यांना आपलेसे करण्याची भूमिका भाजपने घेतली होती. तरीही स्वत:च्या कमळ चिन्हावर १५ सदस्य जिल्हा परिषदेत धाडण्यात भाजपला यश मिळाले. खा. विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे चिरंजीव रणजितसिंह व पुतणे धैर्यशील यांनी मात्र माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गडावरील हल्ल्यांना परतवून लावण्यात यश मिळविले आहे. ११ पैकी ८ जागांवर राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्याची किमया मोहिते-पाटलांनी केली.
६८ सदस्य संख्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने २३, भाजपने १५ तर स्थानिक आघाड्यांनी २३ तर काँग्रेसने केवळ ६ सदस्य निवडून आणण्यात यश मिळविले आहे. देशाचे नेते शरद पवार, राज्याचे नेते अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावांवर राजकीय दुकान चालविणारे जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादी पक्षाच्या जि.प.तील २३ जागांचा वापर कसा करणार, जिल्ह्यातील तरुण तुर्क नेते आता कोणती व्यूहरचना करणार आणि भाजप नेते सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख राजकारणाचा डाव कसा मांडणार, यावरच राष्ट्रवादीच्या जि.प.वरील सत्तेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.