सोलापुरात दीडशे कोटींच्या मालमत्तेवर टाच
By Admin | Published: September 26, 2015 01:37 AM2015-09-26T01:37:27+5:302015-09-26T01:37:27+5:30
वारंवार नोटिसा बजावूनही कर्जाची परतफेड न करणारे विविध बँकांचे थकबाकीदार तसेच जामीनदारांच्या मालमत्तांचा ताबा घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला़
सोलापूर : वारंवार नोटिसा बजावूनही कर्जाची परतफेड न करणारे विविध बँकांचे थकबाकीदार तसेच जामीनदारांच्या मालमत्तांचा ताबा घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला़ सुमारे २० कर्जदारांकडून एकूण १५० कोटींची रक्कम थकित असून यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबीय, महेश कोठे, विश्वनाथ भुतडा आदींच्या संस्थांचा समावेश आहे़
जिल्हाधिकाऱ्यांनी २० कर्ज प्रकरणात निर्णय घेतला आहे़ आता त्या-त्या तालुक्यांतील तहसीलदार संबंधित मिळकतीचा ताबा घेऊन कब्जेपावती संबंधित बँकेच्या ताब्यात देतील़ जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही मोठी कारवाई आहे़
बँकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थकबाकीदार कर्जदाराचे
प्रकरण सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कर्जदार किंवा त्यांचे जामीनदार यांच्या मालमत्तेचा ताबा घेऊन तो बँकेला हस्तांतरित करतात़ तहसीलदार सदर मिळकतीचा ताबा घेऊन कब्जेपावती बँकेला देतात,
अशी तरतूद सेक्युरिटायजेशन अॅक्टमध्ये आहे.
--
प्रमुख कर्जदार आणि त्यांच्या रकमा
सोलापुरातील निवास स्पिनिंग मिलचे विजय जाजू यांनी अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया यांच्याकडून ५७ कोटी ८३ लाख कर्ज घेतले, त्याची परतफेड न केल्यामुळे चिंचोळी एमआयडीसीमधील प्लॉट ए ५, ए ८ चा ताबा घेतला आहे़
शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज यांनी डीसीसी बँकेकडून १०़१६ कोटी कर्ज घेतले आहे़ मोहिते-पाटील कुटुंबीय यासाठी जामीनदार आहेत़ या कर्जापोटी यशवंतनगर येथील गट क्रमांक ७८/२, प्लॉट क्रमांक १०, २७८ चौरस मीटर, गट क्र ़ ५५/२/२ चे २ हेक्टर तसेच मंगळवेढा येथील ०़८३ हेक्टर क्षेत्र व प्लॅन्ट अॅण्ड मशिनरी, फॅक्टरी बिल्डिंग जप्त करून बँकेस ताबा दिला आहे़ रणजितसिंह सहकारी पशुपक्षी पालन संघाने देखील डीसीसीकडून १़७३ कोटी कर्ज थकीत ठेवल्यामुळे नातेपुते येथील गट नं़ ९५ आणि ९७ चा ताबा बँकेला देण्याचा निर्णय दिला आहे़
एक्सेल कृषी प्रक्रिया प्रा़ लि़ पंढरपूर यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून २०़१० कोटी कर्ज घेतले होते़ त्याची परतफेड न केल्यामुळे पंढरपुरातील सुभाष भोसले कुटुंबीयांची विरंगुळा हॉटेल, भटुंबरे गावातील १़९१ हेक्टर जागा तसेच पंढरपुरातील ४ हेक्टर जागा ताब्यात घेऊन बँकेला दिला आहे़
विष्णू गायत्री बायो कोल आणि अॅग्रो प्रोडक्ट्सचे सतीश धरणे यांनी बँक आॅफ महाराष्ट्र शंकरनगर, पुणे शाखेतून ११ कोटी कर्ज घेतले़ याला महेश कोठे जामीनदार आहेत़ त्यामुळे गंगेवाडी (द़ सोलापूर) येथील २ हेक्टर ९५ आरचा ताबा बँकेस देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे़